वाशीम,
anil subramaniam देशाचे उज्ज्वल भविष्य घडवायचे असेल तर प्रत्येक बालकाला सुरक्षित, भयमुक्त आणि आनंदी वातावरण मिळणे अत्यंत आवश्यक आहे. शिक्षणासोबतच बालकांना त्यांच्या हक्कांचे आणि कायद्यांचे ज्ञान असणे काळाची गरज आहे, असे प्रतिपादन वाशीमचे प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश अनिल सुब्रमण्यम यांनी केले. जिल्हा विधि सेवा प्राधिकरणाच्या वतीने शाळा आणि महाविद्यालयांमध्ये सुरू करण्यात आलेल्या सुरक्षित बचपन अभियान अंतर्गत श्रीमती राधादेवी बाकलीवाल कन्या विद्या निकेतन येथे आयोजित मार्गदर्शन शिबिरात ते बोलत होते.
या शिबिराच्या अध्यक्षस्थानी जिल्हा व सत्र न्यायाधीश अनिल सुब्रमण्यम हे होते. यावेळी जिल्हा पोलिस अधीक्षक निलेश खाटमोडे, जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे सचिव व्ही. जी. चौखंडे, जिल्हा विधीज्ञ मंडळाचे अध्यक्ष अॅड. आर. के. इंगोले, श्री बाकलीवाल चॅरिटेबल ट्रस्टचे अध्यक्ष अँड सुरेंद्रकुमार बाकलीवाल, संचालक अॅड. अनुप बाकलीवाल, जिल्हा विधीज्ञ मंडळाचे सचिव अॅड हर्षल बोबडे, चौधरी यांची प्रमुख उपस्थिती होती.
यावेळी जिल्हा पोलिस अधीक्षक निलेश खाटमोडे यांनी आपल्या भाषणात स्पष्ट केले की, १८ वर्षांपेक्षा कमी वयाच्या सर्व मुला-मुलींना सुरक्षितता प्रदान करण्यासाठी ’पोसो कायदा’ हा कडक आणि बाल-स्नेही कायदा आहे. गुन्हेगारांना कायद्यानुसार कठोर शिक्षा दिली जाईल.तसेच मुलांनी लहानपणापासूनच ’गुड टच’ आणि ’बैड टच’ मधील फरक समजून घेतला पाहिजे. यावेळी जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे सचिव व्हि. जी.चौखंडे म्हणाले की,समाजातील बालकामगार प्रथा, बालविवाह आणि कुटुंबात केला जाणारा मुलगा-मुलगी असा भेदभाव हा कायद्याने गंभीर गुन्हा आहे, अशा सामाजिक समस्यांचे समूळ उच्चाटन करण्यासाठी केवळ न्यायालय किंवा प्रशासनच नाही, तर वकील संघ, शिक्षक आणि पालकांनीही पुढे येण्याची गरज आहे.anil subramaniam या कार्यक्रमाला जिल्हा विधिक सेवा प्राधिकरणाचे पदाधिकारी, वकील संघाचे प्रतिनिधी, विविध शाळांचे प्राचार्य, शिक्षक आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. बालकांच्या हक्कांचे रक्षण करण्याची आणि त्यांचे बालपण सुरक्षित करण्याची शपथ घेऊन कार्यक्रमाचा समारोप करण्यात आला.
या कार्यक्रमाचे संचालन अँड. पुजा अंभोरे यांनी तर आभार प्रदर्शन ज्ञानेश्वर वाकुडकर यांनी केले.या कार्यक्रमासाठी प्राचार्य बबन बिल्लारी, प्राचार्य विनायक उज्जैनकर, नितीन चव्हाण यांचेसह प्रा. अजयसिंह ठाकुर, अमोल काळे, लिपिक प्रसाद भोसले, अजय क्षिरसागर, मोतीराम खडसे यांचेसह श्रीमती राधादेवी बाकलीवाल कन्या विद्या निकेतन, श्री बाकलीवाल विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय, श्री बाकलीवाल मराठी प्राथमिक शाळेच्या शिक्षक-शिक्षकेतर कर्मचार्यांनी परिश्रम घेतले.