चीनच्या उलट्या बोंबा

"आशा आहे भारत कराराचे पालन करेल"

    दिनांक :26-Oct-2026
Total Views |
नवी दिल्ली  
india china भारत आणि चीन यांच्यातील अरुणाचल प्रदेश सीमेवर पुन्हा एकदा तणाव निर्माण झाल्याच्या बातम्या समोर आल्यानंतर चीन सरकारकडून यावर पहिली अधिकृत आणि महत्त्वाची प्रतिक्रिया समोर आली आहे. भारत-चीन सीमेवर नुकत्याच झालेल्या चकमकीची जोरदार चर्चा रंगली असताना, चीनच्या परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते गुओ जियाकुन यांनी सोमवारी चीनच्या भूमिकेवर स्पष्टीकरण दिले आहे. चीनचे सैनिक सीमेवर नियमित पेट्रोलिंग (Patrolling) करत असतात आणि चीन सर्व करारांचे पूर्ण पालन करतो. भारतानेही या परस्पर सहमतीचे पालन करावे, अशी चीनची अपेक्षा आहे, असे त्यांनी म्हटले आहे.

china border
आयटीबीपीचे महासंचालक शत्रुजीत कपूर यांच्या वक्तव्यानंतर सीमेवरील या तणावाच्या आणि चकमकीच्या बातम्या समोर आल्या होत्या. त्यानंतर आंतरराष्ट्रीय स्तरावर या घडामोडींची वेगाने चर्चा सुरू झाली आहे. चीनच्या परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते गुओ जियाकुन यांनी पत्रकार परिषदेत सांगितले की, चिनी सैन्याची पेट्रोलिंग ही निश्चित केलेल्या नियमांनुसारच होत असते. चिनी सरकारी वृत्तपत्र 'ग्लोबल टाईम्स'च्या अहवालानुसार, गुओ जियाकुन म्हणाले, "चीनने दोन्ही देशांमध्ये झालेल्या करारांचे आणि सहमतीचे काटेकोरपणे पालन केले आहे. प्रादेशिक सार्वभौमत्व आणि सीमेवरील स्थैर्य राखण्यासाठी चीन सीमावर्ती भागात नियमित पेट्रोलिंग करतो आणि सीमेच्या व्यवस्थापनाचे काम पाहतो."
चीनची भारताकडून काय अपेक्षा?
भारतासोबतच्या संबंधांवर बोलताना गुओ जियाकुन म्हणाले, "भारतासोबत राजनैतिक (Diplomatic) चर्चेचा मार्ग नेहमीच खुला राहील. चीनला अपेक्षा आहे की भारत देखील परस्पर सहमतीचा आणि करारांचा मान राखेल तसेच सीमेवर शांतता राखण्यासाठी ठोस पावले उचलेल. सीमावर्ती भागात भारताने याचे विशेष भान ठेवावे."

नक्की काय घडले होते सीमेवर?
आयटीबीपीचे डीजी शत्रुजीत कपूर यांनी नुकतेच भारत-चीन सीमेबाबत एक वक्तव्य केले होते. अरुणाचल प्रदेश सीमेवर दोन्ही देशांच्या सैनिकांमध्ये अनेकदा समोरासमोर येण्याची आणि तणावाची परिस्थिती निर्माण झाली असल्याचे त्यांनी सांगितले होते. मात्र, अशा तणावाच्या प्रसंगी भारतीय जवानांनी अत्यंत कणखरपणे आणि धैर्याने परिस्थिती हाताळत आपली जबाबदारी पार पाडली, असेही कपूर म्हणाले होते. त्यांच्या या वक्तव्यानंतर देशांतर्गत राजकारण तापले असून, विरोधी पक्षांनी केंद्र सरकारवर या मुद्द्यावरून निशाणा साधला होता.