नवी दिल्ली,
lung cancer treatment फुफ्फुसाच्या कर्करोगाच्या आक्रमक प्रकारावर उपचार करण्यासाठी झालेल्या नव्या संशोधनातून आशादायक निष्कर्ष समोर आले आहेत. अमेरिकेतील ॲमजेन कंपनीचे ‘इमडेल्ट्रा’ आणि ॲस्ट्राझेनेकाचे ‘इम्फिन्झी’ ही दोन औषधे एकत्र दिल्यास, केवळ इम्फिन्झी औषध देण्याच्या तुलनेत रुग्णांच्या मृत्यूचा धोका ५८ टक्क्यांनी कमी झाल्याचे अभ्यासात आढळले आहे. वेगाने पसरणाऱ्या आणि उपचार करणे कठीण मानल्या जाणाऱ्या स्मॉल सेल लंग कॅन्सरच्या प्रगत अवस्थेतील रुग्णांवर हे संशोधन करण्यात आले. सुरुवातीच्या केमोथेरपीनंतरही आजार न वाढलेल्या रुग्णांसाठी इम्फिन्झीचा वापर हा सध्या उपचारांचा एक मान्यताप्राप्त पर्याय आहे.

या संशोधनात एकूण ५६३ रुग्णांचा समावेश करण्यात आला होता. दोन्ही औषधांचा एकत्रित उपचार घेतलेल्या रुग्णांचा सरासरी जगण्याचा कालावधी २१.१ महिने नोंदवण्यात आला, तर केवळ इम्फिन्झी घेणाऱ्या रुग्णांमध्ये तो १२.७ महिने होता. उपचारानंतर एका वर्षाने दोन्ही औषधे घेणाऱ्या सुमारे ८० टक्के रुग्णांचे अस्तित्व कायम होते. तुलनेत, केवळ इम्फिन्झी घेणाऱ्या गटातील ५३ टक्के रुग्ण एक वर्षानंतर जिवंत होते. ॲमजेनचे मुख्य वैद्यकीय अधिकारी पॉल बर्टन यांनी या निष्कर्षांना स्मॉल सेल लंग कॅन्सरच्या उपचारातील महत्त्वपूर्ण प्रगती असल्याचे म्हटले आहे. त्यांच्या मते, उपचाराच्या प्रक्रियेत इमडेल्ट्राचा वापर लवकर सुरू केल्यास रुग्णांना अधिक फायदा होण्याची शक्यता आहे. इमडेल्ट्रा हे बायस्पेसिफिक अँटीबॉडी प्रकारातील औषध असून, ते रोगप्रतिकारक यंत्रणेतील टी-पेशींना कर्करोगाच्या पेशी ओळखून त्यांच्यावर हल्ला करण्यास मदत करते. तर इम्फिन्झी हे इम्युनोथेरपी औषध शरीराच्या रोगप्रतिकारक यंत्रणेपासून बचाव करण्यासाठी ट्यूमरकडून वापरल्या जाणाऱ्या प्रक्रियेत अडथळा आणते. केमोथेरपीनंतरही आजार वाढणाऱ्या प्रौढ रुग्णांच्या उपचारासाठी अमेरिकेत इमडेल्ट्राला मान्यता देण्यात आली आहे. यापूर्वीच्या आकडेवारीतही या औषधामुळे मृत्यूचा धोका ४० टक्क्यांनी कमी झाल्याचे दिसून आले होते.
मात्र, या उपचारपद्धतीसोबत काही गंभीर दुष्परिणामांचाही धोका असल्याचे संशोधनात स्पष्ट झाले आहे. दोन्ही औषधे घेणाऱ्या रुग्णांपैकी २०.९ टक्के रुग्णांमध्ये गंभीर दुष्परिणाम आढळले, तर केवळ इम्फिन्झी घेणाऱ्या गटात हे प्रमाण १०.८ टक्के होते. पांढऱ्या रक्तपेशींची संख्या कमी होणे हा त्यातील एक गंभीर परिणाम होता. तसेच, इमडेल्ट्रा घेणाऱ्या ४९.६ टक्के रुग्णांमध्ये सायटोकाइन रिलीज सिंड्रोम (सीआरएस) आढळून आला. उपचाराचा मोठा खर्च हेही या औषधासमोरील आव्हान आहे. अमेरिकेत इमडेल्ट्राच्या एका उपचार चक्राची सूचीबद्ध किंमत सुमारे ३० हजार डॉलर असून, वार्षिक खर्च ३ लाख ९० हजार डॉलरपेक्षा अधिक होऊ शकतो. एलएसईजीच्या आकडेवारीनुसार, २०३० पर्यंत या औषधाची वार्षिक विक्री २.५ अब्ज डॉलरपेक्षा जास्त होण्याचा बाजार विश्लेषकांचा अंदाज आहे.lung cancer treatment अमेरिकेच्या नॅशनल इन्स्टिट्यूट्स ऑफ हेल्थच्या माहितीनुसार, जगभरात दरवर्षी स्मॉल सेल फुफ्फुसाच्या कर्करोगाची अंदाजे २ लाख ५० हजार नवीन प्रकरणे आढळतात. फुफ्फुसाच्या कर्करोगाच्या एकूण रुग्णांपैकी सुमारे १५ टक्के रुग्ण या प्रकाराने ग्रस्त असतात. हे निष्कर्ष आशादायक असले, तरी उपचाराची परिणामकारकता, दुष्परिणाम आणि खर्च यांचा विचार करूनच या औषधांचा वापर वैद्यकीय तज्ज्ञांच्या देखरेखीखाली करणे आवश्यक आहे.