‘बिग बॉस २०’मधून मेरी कोम बाहेर

आम्रपाली दुबेला अश्रू अनावर, रोहित शेट्टींच्या घोषणेने घरात खळबळ

    दिनांक :26-Oct-2026
Total Views |
मुंबई
mary kom ‘बिग बॉस २०’च्या यंदाच्या ‘वीकेंड का वार’मध्ये सलमान खानऐवजी दिग्दर्शक रोहित शेट्टी सूत्रसंचालन करताना दिसले. सलमान खानने मागील आठवड्यातच या भागाची जबाबदारी रोहित शेट्टी सांभाळणार असल्याचे जाहीर केले होते. त्यानुसार शनिवारी, २४ ऑक्टोबर रोजी रोहित यांनी घरातील सदस्यांना त्यांच्या वागणुकीचा आरसा दाखवला. यावेळी त्यांनी स्काउट ओपी आणि लवप्रीत गिल यांची कानउघाडणी केली, तर शोमधून बाहेर पडणाऱ्या स्पर्धकाचे नाव जाहीर करून सर्वांना धक्का दिला. कमी मते मिळाल्याने आणि दोन्ही लाइफलाइन गमावल्यामुळे मेरी कोमचा शोमधील प्रवास संपल्याचे त्यांनी सांगितले. मेरी कोमच्या एक्झिटमुळे आम्रपाली दुबे भावूक झाली आणि तिला अश्रू अनावर झाले.
 

mary kom eliminated from bigg boss 20, amrapali dubey breaks down as rohit shetty announces eviction 
रोहित शेट्टी यांनी मेरी कोमच्या एलिमिनेशनची घोषणा करताच घरातील सदस्यांना आश्चर्याचा धक्का बसला. शोमध्ये सहभागी होण्याची संधी मिळाल्याबद्दल मेरी कोमने आभार मानले. आतापर्यंतचा अनुभव चांगला असल्याचे सांगत तिने घरातील सदस्य आपली आठवण काढतील, अशी अपेक्षा व्यक्त केली. तसेच, घराबाहेर गेल्यानंतरही आपल्या व्यक्तिमत्त्वाची छाप कायम ठेवणार असल्याचे तिने म्हटले. बॉक्सिंग रिंगमध्ये मात्र प्रतिस्पर्ध्याला सोडणार नसल्याचेही तिने मिश्किलपणे सांगितले. मेरी कोमच्या निरोपावेळी घरातील सदस्यांनी ‘यू आर ए चॅम्पियन’ असे म्हणत तिचा गौरव केला. हे ऐकून मेरी कोमही हसू लागली. मात्र, तिच्या एक्झिटमुळे आम्रपाली दुबे ढसाढसा रडली. या आठवड्यात आम्रपाली दुबे, मनीष गोयल, अरिश्फा खान, कुशल तंवर ऊर्फ गुल्लू, लव गिल आणि मेरी कोम हे स्पर्धक एलिमिनेशनसाठी नामांकित झाले होते.
दरम्यान, वाइल्डकार्ड स्पर्धक मनीष गोयललाही या आठवड्यात मोठा धक्का बसला. मेरी कोमला सर्वांत कमी मते मिळाल्याने तिला घराबाहेर पडावे लागले, तर मनीष गोयल बॉटम टू अर्थात सर्वांत कमी मतांच्या यादीतील दोन स्पर्धकांमध्ये होता. त्यामुळे त्याची एक लाइफलाइन संपली असून आता त्याच्याकडे केवळ एकच लाइफलाइन उरली आहे. मनीषने दोन आठवड्यांपूर्वीच वाइल्डकार्डद्वारे शोमध्ये प्रवेश केला होता. त्यामुळे इतक्या लवकर बॉटम टूमध्ये पोहोचणे त्याच्यासाठी धक्कादायक ठरले. त्याच्यासोबत वाइल्डकार्ड स्पर्धक म्हणून नकुल धुलनेही प्रवेश केला होता; मात्र गुल्लूसोबत झालेल्या हाणामारीनंतर त्याला शोमधून बाहेर काढण्यात आले होते.
दुसरीकडे, शोच्या आगामी mary kom  भागात स्काउट ओपीची प्रेयसी काश्वी हिरानंदानी पाहुणी म्हणून येणार असल्याचे समोर आले आहे. रविवार, २५ ऑक्टोबरच्या भागासाठी निर्मात्यांनी प्रसिद्ध केलेल्या प्रोमोमध्ये काश्वी स्काउट आणि लव गिल यांच्या नात्याबाबत थेट प्रश्न विचारताना दिसते. स्काउट आपली बाजू मांडण्याचा प्रयत्न करत असताना काश्वीने त्यांच्या वागण्यामुळे तिला आणि तिच्या कुटुंबीयांना लाजिरवाण्या परिस्थितीला सामोरे जावे लागत असल्याचे म्हटले. स्काउट आणि लव यांच्यात स्पष्ट मर्यादा आखण्याची गरज असल्याचे सांगत तिने स्काउटला लवपासून अंतर ठेवण्याचा सल्लाही दिला. त्यामुळे आगामी भागात स्काउट आणि काश्वी यांच्यातील संवादामुळे शोमध्ये आणखी नाट्यमय घडामोडी पाहायला मिळण्याची शक्यता आहे.