मुंबई लोकल ठप्प! साडेतीन तास ट्रेन एकाच जागी!

    दिनांक :26-Oct-2026
Total Views |

मुंबई,
mumbai-local-train-signal-failureमुंबईची लाईफलाईन मानली जाणाऱ्या उपनगरीय रेल्वे मार्गावरील लोकल ट्रेनची सेवा सोमवारी प्रचंड मोठ्या तांत्रिक बिघाडामुळे पूर्णपणे कोलमडून पडली. सकाळी 10 वाजता मध्य रेल्वे मार्गावर मुलुंड ते ठाणेआणि कांजूरमार्ग ते भांडूप अशा दोन ठिकाणी सिग्नल यंत्रणेत बिघाड निर्माण झाला. तांत्रिक बिघाड पाचवीला पुजलेल्या मध्य रेल्वेच्या प्रवाशांना हा नेहमी प्रमाणे लहानसहान बिघाड असेल, असे वाटले होते. मात्र, आता साडेतीन तास उलटून गेल्यानंतरही मध्य रेल्वेची वाहतूक पूर्णपणे ठप्प आहे.
 
 
local
 
 
सिग्नल यंत्रणेतील या बिघाडामुळे अप आणि डाऊन अशा दोन्ही दिशेची जलद आणि धीम्या मार्गावरील दोन्हीकडची वाहतूक बंद आहे. यामुळे सकाळी कार्यालयात जाण्यासाठी निघालेले कर्मचारी ट्रेनमध्येच अडकून पडले आहेत. सध्या मुंबईत प्रचंड ऑक्टोबर हिट जाणवत आहे. अशात लोकल ट्रेन एकाच जागी अडकून पडल्याने प्रवाशांचे प्रचंड हाल झाले. अखेर काही प्रवाशांनी कंटाळून लोकल ट्रेनमधून उतरुन रेल्वे ट्रॅकवरुन पायी चालत जाणे पसंत केले.
 
सकाळी 10 वाजल्यापासून मध्य रेल्वेच्या वाहतुकीचा पूर्णपणे बोजवारा उडाला आहे. रेल्वे सेवा ठप्प होऊन साडेतीन तास उलटले आहेत तरी अद्याप रेल्वे प्रशासनाला सिग्नल यंत्रणेतील बिघाड दुरुस्त करता आलेला नाही. हा बिघाड दुरुस्त होण्यासाठी आणखी चार ते पाच तास लागू शकतात, अशी सूत्रांची माहिती आहे. त्यामुळे आज संध्याकाळी घरी परततानाही मुंबईकरांचे प्रचंड हाल होण्याची शक्यता आहे. मध्य रेल्वेची वाहतूक ठप्प असल्याने आता इस्टर्न एक्स्प्रेस हायवे आणि एलबीएस रोडवरील वाहतूक कोंडीत भर पडण्याची शक्यता आहे.
 
कालच मध्य रेल्वेमार्गावर मेगाब्लॉक होता. मात्र, त्यानंतरही आठवड्याच्या पहिल्याच दिवशी सिग्नल यंत्रणेत बिघाड निर्माण झाल्याने प्रवाशांकडून संताप व्यक्त केला जात आहे. देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईत इतक्या महत्त्वाच्या वाहतूक व्यवस्थेतील बिघाड दुरुस्त करायला यंत्रणांना चार तास उलटूनही यश मिळत नाही, यावरुन रेल्वे प्रशासनाला लक्ष्य केले जात आहे. मध्य रेल्वे मार्गावरील उशीरा येणाऱ्या गाड्या आणि तांत्रिक बिघाड हे प्रवाशांना नवीन नाहीत. मात्र, सोमवारी या सगळ्याचा कळस गाठला गेला. याबाबत आता रेल्वे प्रशासन काय स्पष्टीकरण देणार, हे बघावे लागेल.