काठमांडू
nepal disaster महाप्रलयात नेपाळमध्ये होत्याचे नव्हते झाले. मात्र, या कठीण काळातही नेपाळने मोठी किमया साधली. नेपाळने सप्टेंबरच्या मध्यापासून ऑक्टोबरच्या मध्यापर्यंतच्या काळात भारताला ३.९० कोटी अमेरिकी डॉलर्सपेक्षा जास्त मूल्याच्या विजेची निर्यात केली.
ऑगस्ट महिन्यात आलेल्या महाप्रलयात अनेक जलविद्युत प्रकल्प आणि वीज वहन पायाभूत सुविधांचे नुकसान झाले असतानाही, या कालावधीत नेपाळने भारताला ६३३.९८६ दशलक्ष युनिट वीज निर्यात केली. यातून नेपाळला ५.९२५ अब्ज नेपाळी रुपये (सुमारे ३.९० कोटी अमेरिकन डॉलर्सपेक्षा जास्त) महसूल मिळाला आहे, असे नेपाळ वीज प्राधिकरणाचे व्यवस्थापकीय संचालक दीर्घायुकुमार श्रेष्ठ यांनी सांगितले.
२६ ऑगस्ट रोजी नेपाळ-तिबेट सीमेवळील उच्च हिमालयात हिमस्खलन आणि खडकांच्या कोसळून आलेल्या अचानक पुरामुळे उत्तर आणि मध्य नेपाळमधील शहरे व गावे उद्ध्वस्त झाली; यात सुमारे १,४०० लोकांचा मृत्यू झाला, तर पाच हजारांपेक्षा जास्त बेपत्ता झाले. पुराच्या काळात घरे, वाहने, रस्ते, पूल आणि जलविद्युत प्रकल्पांचे नुकसान झाले. भारताला निर्यात केलेल्या विजेपैकी सुमारे दोन तृतीयांश वीज ही द्विपक्षीय वीज विक्री करारांतर्गत पुरवण्यात आली होती, असे श्रेष्ठ यांनी सांगितले.
पुरामुळे त्रिशुली आणि चिलीमे जलविद्युत प्रकल्पांचे नुकसान झाले होते; या प्रकल्पांतून बांगलादेशला वीजपुरवठा करण्यास यापूर्वीच मंजुरी देण्यात आली होती. भारताच्या मध्यवर्ती वीज प्राधिकरणाने इतर जलविद्युत प्रकल्पांतून निर्माण होणारी वीज बांगलादेशला पुरवण्यासाठी मंजुरी दिल्यानंतर, शेजारील देशाला होणारा वीजपुरवठा पुन्हा सुरू झाला आहे.