मुंबई,
Nine-month-old baby thrown from skywalk मुंबईतील घाटकोपर रेल्वे स्थानक परिसरात पती-पत्नीमधील वादातून नऊ महिन्यांच्या बाळाला स्कायवॉकवरून खाली फेकल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. रविवारी रात्री सुमारे दहाच्या सुमारास घडलेल्या या प्रकारात आरव नावाचे बाळ गंभीर जखमी झाले आहे. त्याच्यावर सध्या शीव रुग्णालयातील अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत. या प्रकरणी घाटकोपर पोलिसांनी आरोपी पित्याविरोधात गुन्हा दाखल करून त्याला अटक केली आहे. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली असून, कौटुंबिक वादातून घडलेल्या या प्रकाराबाबत संताप व्यक्त केला जात आहे.

या प्रकरणातील तक्रारदार आरती जाफर शेख (वय २२) या घाटकोपरमधील सर्वोदय नगर परिसरात राहतात. त्यांचा सुमारे दोन वर्षांपूर्वी जाफर शेख (वय २३) याच्याशी विवाह झाला होता. या दाम्पत्याला आरव हा नऊ महिन्यांचा मुलगा आहे. जाफरचा परिसरात कपडे विक्रीचा व्यवसाय असल्याची माहिती आहे. त्याला नशा करण्याचे व्यसन असल्यामुळे गेल्या काही महिन्यांपासून पती-पत्नीमध्ये वारंवार वाद होत असल्याचे समोर आले आहे. रविवारीही दोघांमध्ये जोरदार भांडण झाले. त्यानंतर रात्री आरती आपल्या बाळासह घाटकोपर पूर्व रेल्वे स्थानक परिसरातील स्कायवॉकवर असताना जाफर तेथे पोहोचला. त्यांच्यात पुन्हा वाद सुरू झाला. यावेळी जाफर बाळाला घेऊन जाण्याचा प्रयत्न करत असल्याचे सांगितले जाते. आरतीने त्याला रोखण्याचा प्रयत्न केला असता, संतापलेल्या जाफरने कथितपणे बाळाला स्कायवॉकवरून खाली फेकले.
घटनेनंतर आरतीने तातडीने खाली धाव घेत स्थानिक नागरिकांच्या मदतीने जखमी बाळाला राजावाडी रुग्णालयात दाखल केले. मात्र, बाळाची प्रकृती गंभीर असल्याने त्याला पुढील उपचारांसाठी शीव रुग्णालयात हलवण्यात आले. सध्या त्याच्यावर अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत. घटनेची माहिती मिळताच घाटकोपर पोलिसांनी तपास सुरू केला. आरती यांनी दिलेल्या तक्रारीच्या आधारे पोलिसांनी जाफर शेख याच्याविरोधात गुन्हा नोंदवून त्याला अटक केली आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस करत आहेत.