ठाणे,
Pradeep Purnekar murder case ठाकरे गटाचे विभागप्रमुख प्रदीप पूर्णेकर यांच्या हत्या प्रकरणात त्यांचे पुत्र राम पूर्णेकर यांनी सोमवारी पत्रकार परिषद घेत एक व्हिडीओ माध्यमांसमोर सादर केला. या व्हिडीओमध्ये माजी महापौर मीनाक्षी शिंदे यांचे पती राजेंद्र शिंदे आणि हत्या प्रकरणातील आरोपी एकत्र दिसत असल्याचा दावा राम पूर्णेकर यांनी केला. पप्या शिंदे, नितेश पवार, संतोष कनोजिया ऊर्फ टल्ली आणि अमित सिंग ऊर्फ पपलू यांच्यासोबत राजेंद्र शिंदे दिसत असल्याचे त्यांनी सांगितले. वडिलांच्या हत्येला २६ दिवस उलटूनही कुटुंबाला न्याय मिळालेला नसल्याची खंत व्यक्त करत मीनाक्षी शिंदे आणि राजेंद्र शिंदे यांना अद्याप अटक का करण्यात आलेली नाही, असा सवालही त्यांनी उपस्थित केला. पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी दूरध्वनीवरून आश्वासन दिले; मात्र अद्याप ठोस कारवाई झालेली नसल्याचा आरोपही राम पूर्णेकर यांनी केला. एका पोलीस अधिकाऱ्याने हेल्मेट घालून आलेल्या व्यक्तीचा व्हिडीओ पाठविल्याचे सांगत, त्यामध्ये आरोपी दिसत असल्याचा दावा त्यांनी केला.

दरम्यान, ठाणे गुन्हे शाखेने राजेंद्र शिंदे यांना आतापर्यंत सात वेळा चौकशीसाठी बोलावल्याची माहिती आहे. हत्या प्रकरणातील आरोपी आणि राजेंद्र शिंदे यांना समोरासमोर बसवूनही चौकशी करण्यात आली होती. मात्र, या तपासातून नेमकी कोणती माहिती समोर आली, हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. प्रदीप पूर्णेकर यांची २९ सप्टेंबर रोजी रात्री साडेनऊच्या सुमारास मनोरमा नगर येथील त्यांच्या कार्यालयात हत्या झाली होती. पाच जणांनी कार्यालयात घुसून त्यांच्यावर गोळीबार केला आणि कोयत्याने वार करून त्यांची हत्या केल्याचा आरोप आहे. या प्रकरणानंतर पूर्णेकर कुटुंबाने माजी महापौर मीनाक्षी शिंदे आणि त्यांचे पती राजेंद्र शिंदे यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. राम पूर्णेकर यांनी सादर केलेल्या व्हिडीओनंतर पोलिसांकडून पुढे कोणती कारवाई केली जाते आणि तपासात काय निष्पन्न होते, याकडे लक्ष लागले आहे. मात्र, व्हिडीओतील दृश्यांवरून कोणाचाही गुन्ह्यातील सहभाग सिद्ध होत नाही; त्याबाबतचा अंतिम निष्कर्ष तपासातूनच स्पष्ट होईल.