मुंबई
prajakta hanamghar स्त्री-पुरुष समानतेची चर्चा अनेक वर्षांपासून सुरू असली, तरी प्रत्यक्ष जीवनात आजही महिलांना अनेक बंधनांचा सामना करावा लागतो. कपड्यांपासून ते घराबाहेर राहण्याच्या वेळेपर्यंत अनेक बाबतींत मुलींसाठी वेगळे नियम असतात, तर मुलांना तुलनेने अधिक स्वातंत्र्य दिलं जातं. ही मानसिकता बदलण्यासाठी मुलांच्या संगोपनापासूनच समानतेची शिकवण देणं गरजेचं आहे, असं मत अभिनेत्री प्राजक्ता हनमघर हिने व्यक्त केलं आहे. तिने मुलांचं संगोपन लिंगभेदापलीकडे जाऊन करण्याची गरज अधोरेखित केली. तिच्या या वक्तव्याची सध्या चर्चा होत आहे.
प्राजक्ताच्या मते, मुलांमध्ये स्त्रियांविषयी आदर आणि समानतेची भावना रुजवण्यात पालकांची भूमिका अत्यंत महत्त्वाची आहे. विशेषतः मुलांच्या आईने त्यांच्या संगोपनात या दृष्टिकोनाला प्राधान्य दिलं पाहिजे. मुलींना संध्याकाळी सात वाजेपर्यंत घरी येण्याची सूचना केली जाते, तर मुलांनाही त्याच वेळेच्या संदर्भात प्रश्न विचारले गेले पाहिजेत. मुलगा असल्यामुळे त्याला कोणत्याही गोष्टीत अमर्याद स्वातंत्र्य आणि मुलगी असल्यामुळे तिच्यावर बंधनं, असा दुहेरी निकष योग्य नसल्याचं तिने स्पष्ट केलं.
“मुलींना तुम्ही सात वाजता घरी यायला सांगता, मग मुलांनाही विचारा की सातनंतर तू काय करतोस? मुलींनी विशिष्ट कपडे घातल्यामुळे त्यांच्यासोबत काही घडतं, असं सांगितलं जातं. त्याऐवजी मुलांनाही कपड्यांबाबत समानतेची जाणीव करून द्यायला हवी,” अशा आशयाचं मत प्राजक्ताने मांडलं. मुलाला शॉर्ट्स घालणं सामान्य वाटत असेल, तर मुलीलाही तेच कपडे घालण्याचं स्वातंत्र्य असायला हवं. मुलांच्या आवडीनिवडी जशा वेगळ्या असू शकतात, तशाच मुलींच्याही असू शकतात. त्यामुळे मुलांच्या मनात लहानपणापासूनच हा विचार रुजवणं आवश्यक असल्याचं तिने सांगितलं.
घरातील कामांची विभागणी करतानाही लिंगभेद केला जाऊ नये, यावर प्राजक्ताने विशेष भर दिला. अनेक घरांमध्ये स्वयंपाक आणि घर सांभाळण्याची जबाबदारी प्रामुख्याने महिलांची असल्याचं मानलं जातं. मात्र, स्वयंपाक करणं हे एक कौशल्य असून ते प्रत्येकाला अवगत असणं महत्त्वाचं आहे, असं तिचं मत आहे. एखाद्या मुलाला स्वयंपाक येत नसेल, तर त्याकडे सहजपणे पाहिलं जातं; मात्र मुलीला स्वयंपाक येत नसेल, तर तिच्यावर प्रश्न उपस्थित केले जातात. ही विसंगती दूर होणं गरजेचं असल्याचं तिने स्पष्ट केलं.
“स्वयंपाक करणं हे कौशल्य आहे आणि ते जगातील प्रत्येकाला यायला हवं, असं मला वाटतं. एखाद्याला ते येत नसेल, तर मुलगा असो किंवा मुलगी, दोघांनाही समान निकष लागू असले पाहिजेत,” असं प्राजक्ता म्हणाली. स्त्री-पुरुष समानतेच्या मुद्द्यावर समाजात अनेक चर्चा आणि आंदोलनं होत असताना, त्यामध्ये लिंगभेदमुक्त दृष्टिकोनाचाही गांभीर्याने विचार व्हायला हवा, असं आवाहन तिने केलं.
लहानपणापासूनच मुलांना समानतेची शिकवण दिल्यास भविष्यात अधिक संवेदनशील आणि समताधिष्ठित समाज घडू शकतो. कोणतंही काम स्त्रीचं किंवा पुरुषाचं आहे, अशी विभागणी न करता प्रत्येक व्यक्तीला समान संधी आणि स्वातंत्र्य मिळणं आवश्यक आहे. लिंगभेदाच्या चौकटींपलीकडे जाऊन जगणारा समाज अधिक सहज आणि आनंददायी असेल, असा विश्वास प्राजक्ता हनमघर हिने व्यक्त केला. तिच्या या भूमिकेमुळे मुलांचं संगोपन, पालकांची जबाबदारी आणि दैनंदिन जीवनातील स्त्री-पुरुष समानता हे विषय पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत.