जयपूर
rajasthan drought राजस्थानमधील भजनलाल शर्मा सरकारने मागविलेल्या अहवालानंतर राज्यातील १३ जिल्ह्यांना दुष्काळग्रस्त घोषित करण्यात आले आहे. आपत्ती निवारण विभागाने सादर केलेल्या अहवालानुसार, या जिल्ह्यांमधील एकूण ५३ तहसील दुष्काळाच्या संकटात सापडल्या आहेत. त्यापैकी ४४ तहसीलांमध्ये गंभीर, तर नऊ तहसीलांमध्ये मध्यम स्वरूपाचा दुष्काळ असल्याचे स्पष्ट झाले आहे. दुष्काळग्रस्त भागांमध्ये विशेष मोहीम राबविण्यात येणार आहे.
दुष्काळग्रस्त घोषित करण्यात आलेल्या जिल्ह्यांमध्ये बांसवाडा, बाडमेर, बालोतरा, चुरू, डुंगरपूर, ब्यावर, जैसलमेर, जालोर, जोधपूर, फलोदी, नागौर, पाली आणि सिरोही यांचा समावेश आहे. या भागांमध्ये पावसाचे कमी प्रमाण, पृष्ठभागावरील पाणी आणि भूजलाच्या उपलब्धतेत झालेली घट तसेच पिकांची खराब स्थिती यांचा परिणाम जाणवत आहे.
गंभीर दुष्काळाचा फटका बसलेल्या ४४ तहसीलांमध्ये गढी, अर्थुना, गडरारोड, चौहटन, बाडमेर, बायतू, सैडवा, रामसर, शिव, धनाऊ, बाडमेर ग्रामीण, गुडामालानी, कल्याणपूर, पचपदरा, राजगढ, आसपूर, गलियाकोट, झौथरीपाल, सागवाडा, फतेहगढ, भणियाना, सम, रामगढ, आहोर, चितलवाना, जसवंतपुरा, बागोडा, भीनमाल, रानीवाडा, सांचोर, सायला, भाद्राजून, ओसियां, तिवरी, बालेसर, बावडी, शेरगढ, शेखाला, फलोदी, बाप, बापिणी, आऊ, सुमेरपूर आणि शिवगंज यांचा समावेश आहे.
मध्यम स्वरूपाच्या दुष्काळाचा सामना करणाऱ्या नऊ तहसीलांमध्ये बांसवाडा जिल्ह्यातील सज्जनगढ, डुंगरपूरमधील सीमलवाडा, पालदेवल आणि ओबरी, ब्यावरमधील रायपूर, जैसलमेरमधील जैसलमेर, जोधपूरमधील पीपाडशहर, फलोदीमधील सेतरावा आणि नागौरमधील खींवसर या तहसीलांचा समावेश आहे.
दुष्काळग्रस्त भागांची निश्चिती rajasthan drought करताना पावसाची कमतरता, पृष्ठभागावरील जलसाठे आणि भूजलाची उपलब्धता, पिकांची स्थिती तसेच भारत सरकारच्या दुष्काळ निरीक्षण पोर्टलवर उपलब्ध असलेल्या माहितीचा विचार करण्यात आला. या निकषांच्या आधारे संबंधित तहसीलांना गंभीर किंवा मध्यम दुष्काळग्रस्त म्हणून वर्गीकृत करण्यात आले आहे.
दरम्यान, यापूर्वी सप्टेंबरमध्ये महाराष्ट्र सरकारनेही मोठा निर्णय घेत राज्यातील २६५ तालुके दुष्काळग्रस्त घोषित केले होते. त्या वेळी राज्यातील सुमारे ७५ टक्के भाग दुष्काळाच्या संकटाने प्रभावित असल्याचे वृत्त समोर आले होते.