राहुल गांधींच्या ताफ्यातील वाहनांना अपघात!

    दिनांक :26-Oct-2026
Total Views |
लखनौ,
Vehicles in Rahul Gandhi's convoy meet an accident उत्तर प्रदेशातील पूर्वांचल द्रुतगती मार्गावर काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या ताफ्यातील वाहनांचा अपघात झाल्याची घटना समोर आली आहे. या दुर्घटनेत ताफ्यातील पाच वाहने आणि एका रुग्णवाहिकेची टक्कर झाली. या अपघातात पक्षाचे कार्यकर्ते, अधिकारी आणि काही सुरक्षा कर्मचारी जखमी झाल्याचे वृत्त आहे. मात्र, राहुल गांधी या दुर्घटनेतून सुखरूप बचावले आहेत. द्रुतगती मार्गावरील ९१ किलोमीटरच्या मैलाच्या दगडाजवळ हा अपघात झाला. त्यावेळी राहुल गांधी लखनौहून सुलतानपूरच्या दिशेने प्रवास करत होते.
 
 
 
ccidentw
 
दरम्यान, राहुल गांधी यांच्यासाठी आजचा दिवस न्यायालयीन दृष्टीने महत्त्वाचा आहे. भाजपचे तत्कालीन राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह यांच्याविषयी २०१८ मध्ये केलेल्या कथित वक्तव्याशी संबंधित मानहानीच्या खटल्यात ते सुलतानपूर येथील खासदार-आमदार न्यायालयात हजर राहणार आहेत. कर्नाटक विधानसभा निवडणुकीच्या प्रचारादरम्यान राहुल गांधी यांनी अमित शाह यांच्याबाबत केलेल्या वक्तव्यावर आक्षेप घेत सुलतानपूर येथील भाजप नेते विजय मिश्रा यांनी ४ ऑगस्ट २०१८ रोजी त्यांच्याविरोधात मानहानीची तक्रार दाखल केली होती. राहुल गांधी यांच्या वक्तव्यामुळे अमित शाह यांची प्रतिमा मलिन झाल्याचा आरोप तक्रारदाराने केला होता.
 
या प्रकरणात दीर्घकाळ कायदेशीर प्रक्रिया सुरू होती. अखेर २० फेब्रुवारी २०२४ रोजी राहुल गांधी सुलतानपूर न्यायालयात हजर झाले होते. त्यावेळी त्यांनी आपल्यावरील आरोप फेटाळून लावत निर्दोष असल्याचे सांगितले होते. न्यायालयाने त्यांना जामीन मंजूर केला होता. त्यानंतर साक्षीदारांचे जबाब, पुरावे आणि दोन्ही बाजूंचे युक्तिवाद यांच्या आधारे सुनावणी पुढे सुरू राहिली. या प्रकरणाच्या निकालासाठी न्यायालयाने २६ ऑक्टोबर ही तारीख निश्चित केली आहे. त्यामुळे आजच्या सुनावणीकडे राजकीय आणि कायदेशीर वर्तुळाचे लक्ष लागले आहे.