विजयादशमी पथसंचलनातून राष्ट्र सेविकांचे शिस्तबद्ध संचलन

उमरेडमध्ये योग, गणसमता व घोष प्रात्यक्षिके

    दिनांक :26-Oct-2026
Total Views |
उमरेड
Path Sanchalan राष्ट्र सेविका समितीच्या प्रमुख पाच उत्सवांपैकी एक असलेल्या विजयादशमीनिमित्त शनिवारी उमरेड येथे पथसंचलनाचे आयोजन करण्यात आले. या संचलनात मोठ्या संख्येने सेविका सहभागी झाल्या. सायंकाळी ४.३० वाजता संघ मैदानावरून सुरू झालेले संचलन अशोक विद्यालय चौक, जीवन विकास चौक, पोलीस स्टेशन, इतवारी मुख्य मार्ग आणि चंद्रा मेडिकल मार्गे पुन्हा संघ मैदानावर पोहोचले.
 
 

Vijayadashami Path Sanchalan by Rashtra Sevika Samiti in Umred 
पथसंचलनानंतर झालेल्या एकत्रीकरणात प्रमुख अतिथी संगीता कृष्णकुमार मिश्रा, प्रमुख वक्त्या अनिता संजय लांबे आणि नगर कार्यवाहिका स्नेहल चांदले यांच्या हस्ते दीपप्रज्वलन व शस्त्रपूजन करण्यात आले. यावेळी सेविकांनी योग, गणसमता आणि घोष प्रात्यक्षिके सादर केली. घोषाच्या निनादाने परिसरात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले.
यावेळी संगीता मिश्रा यांनी योगाचे महत्त्व विशद केले. अनिता लांबे यांनी राष्ट्र सेविका समितीच्या स्थापनेचा इतिहास सांगताना वंदनीय मावशी केळकर आणि वंदनीय ताई आपटे यांच्या कार्याचा परिचय करून दिला. तसेच पंचपरिवर्तनातील कुटुंब प्रबोधनाचे महत्त्व स्पष्ट केले. भूषा, भाषा, भ्रमण, भजन, भोजन आणि भवन या सहा ‘भ’च्या माध्यमातून भारतीय जीवनमूल्यांचे जतन करण्याचे आवाहनही त्यांनी केले.
कुटुंब हा भारतीय समाजाचा आधार असून, सुसंस्कारित कुटुंबनिर्मिती ही काळाची गरज आहे, असे प्रतिपादन लांबे यांनी केले. बदलत्या सामाजिक परिस्थितीत भारतीय संस्कार आणि मूल्यांचे जतन करण्यासाठी समिती कार्यरत असल्याचे त्यांनी सांगितले. कार्यक्रमाला संघबंधूंची उपस्थिती होती. सेविका आणि स्वयंसेवकांच्या सहकार्याने विजयादशमी उत्सव उत्साहात पार पडला.