वर्धा,
guardian minister bhoyar जागृत दृष्टी साहित्य संमेलनाने समाजाला नवी दिशा दिली असून संमेलनात मांडण्यात आलेल्या प्रस्तावांचा गांभीर्याने विचार केला जाईल. दृष्टिहीनांच्या हितासाठी शासनाचे सर्वतोपरी सहकार्य राहील, अशी ग्वाही पालकमंत्री डॉ. पंकज भोयर यांनी पहिल्या राज्यस्तरीय जागृत दृष्टी साहित्य संमेलनाच्या समारोप समारोहात दिली.
स्थानिक स्वाध्याय मंदिर सभागृहात आयोजित या समारोहाच्या अध्यक्षस्थानी ज्येष्ठ साहित्यिक संजय इंगळे तिगावकर होते. यावेळी कृषिविचारक अॅड. दिनेश शर्मा, राष्ट्रीय दृष्टिहीन संघाचे राज्याध्यक्ष भोजराज पाटील, महासचिव डी. पी. जाधव, कोषाध्यक्ष डी. एन. मरडे, माजी अध्यक्ष लक्ष्मण खापेकर, मानद अध्यक्ष कविता बिराजदार, राष्ट्रीय सचिव जगदीप कवाळ, कार्यकारी सदस्य राहुल बिजवे, विदर्भ साहित्य संघाचे माजी अध्यक्ष प्रदीप दाते, संस्कार भारतीचे जिल्हा मंत्री मकरंद उमाळकर, संमेलन समन्वयक नरेंद्र नरोटे यांची प्रमुख उपस्थिती होती.
समारोप समारोहात संमेलनाध्यक्ष संजय इंगळे तिगावकर यांनी, दृष्टिहीनांचा लोकशाही प्रक्रियेत प्रत्यक्ष सहभाग असावा यासाठी विधान परिषद तसेच राज्यसभेवर त्यांच्यातून एकेक प्रतिनिधी नियुत करण्यात यावा, जेणेकरून त्यांना स्वतः आपल्या समस्या मांडता येतील व त्या सोडविण्याकरिता उपाययोजनाही सुचवता येतील, अशी मागणी करीत राष्ट्रीय दृष्टिहीन संघाच्यावतीने नऊ प्रस्ताव मांडले.guardian minister bhoyar यावेळी, राष्ट्रीय दृष्टिहीन संघ ही सर्वमान्य व केंद्रीय संस्था असून या संस्थेला दरवर्षी जागृत दृष्टी साहित्य संमेलन आयोजित करण्यासाठी अन्य संमेलनांप्रमाणे शासन निधी उपलब्ध करून द्यावा, महाराष्ट्रात आयोजित मुख्य साहित्य संमेलनांमध्ये दृष्टिबाधितांकरिता एक स्वतंत्र सत्र असावे, साहित्य अकादमीवर किमान एक दृष्टिबाधित प्रतिनिधी नियुत करण्यात यावा, दृष्टिहीन साहित्यिकांच्या साहित्याला प्रोत्साहन देण्यासाठी त्यांचे साहित्य ब्रेल लिपीत प्रसिद्ध करण्यात यावे, मराठी व अन्य भाषांतील उत्कृष्ट साहित्य ब्रेल लिपीत उपलब्ध करून द्यावे, ब्रेल पुस्तकांप्रमाणेच मोठ्या प्रमाणात दर्जेदार साहित्यावरील ध्वनिपुस्तके (ऑडिओ बुक) उपलब्ध करून द्यावीत, शैक्षणिक संस्था तथा विद्यापीठांच्या अभ्यासक्रमात दृष्टिहिनांच्या प्रेरक साहित्याचा समावेश करण्याबाबत राज्य शासनाच्या भाषा व सांस्कृतिक विभागाच्या माध्यमातून शासकीय अध्यादेशाद्वारे निर्देश देण्यात यावेत, आदी ठरावांवर सभागृहाची मान्यता घेण्यात आली. संमेलनाच्या यशस्वितेसाठी प्रा. शैला देशपांडे, प्रसन्न कवडीकर, अश्विनी कोतवाल, डॉ. प्रदीप सुने, डॉ. विनोद अदलखिया, डॉ. जयंत मकरंदे, डॉ. सचिन पावडे, आदींनी सहकार्य केले.