अनिल कांबळे
नागपूर,
Nagpur Metro Station मेट्रोने प्रवास करण्यासाठी लिफ्टजवळ थांबलेल्या 16 वर्षीय मुलीसमोर अश्लील कृत्य केल्याच्या आरोपावरून लकडगंज पोलिसांनी ५२ वर्षीय व्यक्तीला अटक केली. अजय जीवन रामटेके (५२, रा. भालदारपुरा) असे आरोपीचे नाव आहे. सेंट्रल अव्हेन्यूवरील चितारओळी मेट्रो स्थानकात ही घटना घडली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित मुलगी शंकरनगरला जाण्यासाठी चितारओळी मेट्रो स्थानकातील लिफ्टजवळ थांबली होती. त्यावेळी आरोपीने अचानक तिच्यासमोर अश्लील चाळे केल्याचा आरोप आहे. या प्रकारामुळे घाबरलेल्या मुलीने घरी गेल्यानंतर पालकांना घटनेची माहिती दिली. पालकांनी मेट्रो स्थानकातील सुरक्षा कर्मचाऱ्यांना याबाबत कळविले. त्यानंतर पोलिसांकडे तक्रार करण्यात आली. तपासादरम्यान पोलिसांनी संशयिताची ओळख पटवून २४ ऑक्टोबरला अजय रामटेके याला ताब्यात घेतले. पीडित मुलीनेही त्याची ओळख पटविल्याचे पोलिसांनी सांगितले. मुलीच्या कुटुंबीयांनी दिलेल्या तक्रारीवरून लकडगंज पोलिसांनी आरोपीविरुद्ध भारतीय न्याय संहितेच्या कलम ७९ तसेच बालकांचे लैंगिक अपराधांपासून संरक्षण कायद्याच्या (पोक्सो) संबंधित तरतुदींनुसार गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास सुरू आहे.