यमुनेत क्रूझ सफारीचा नवा अध्याय!

    दिनांक :27-Oct-2026
Total Views |
नवी दिल्ली,
cruise-safaris-on-the-yamuna राजधानी दिल्लीमध्ये पर्यटनाला नवी दिशा देण्यासाठी यमुना नदीवर ‘नमो यमुना – रिव्हर सफारी’ ही क्रूझ सेवा सुरू करण्याची तयारी करण्यात आली आहे. या उपक्रमाच्या चाचणी फेऱ्यांना २६ ऑक्टोबरपासून सुरुवात झाली असून, मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांनी स्वतः या प्रकल्पाची पाहणी केली. सोनिया विहार ते जगतपूर या मार्गावर ही सेवा चालविण्याचे नियोजन असून, यामुळे दिल्लीकरांना तसेच पर्यटकांना यमुना नदीतून सफर करण्याचा नवा अनुभव मिळणार आहे.

cruise-safaris-on-the-yamuna
या क्रूझ सेवेमध्ये सोनिया विहार ते जगतपूरदरम्यान सुमारे पाच किलोमीटरचा प्रवास करता येणार आहे. एका फेरीसाठी अंदाजे ४० मिनिटांचा कालावधी लागेल. प्रत्येक प्रवाशासाठी तिकिटाचे दर ५०० रुपये निश्चित करण्यात आले असून, एका क्रूझमधून एकावेळी जास्तीत जास्त ३० जणांना प्रवास करता येणार आहे. तिकिटांचे ऑनलाइन आरक्षण दिल्ली पर्यटन विभागाच्या संकेतस्थळावरून करण्याची सुविधा उपलब्ध करून देण्याचे नियोजन आहे.
या सेवेचे अधिकृत उद्घाटन करण्यापूर्वी चार ते पाच दिवस चाचणी फेऱ्या घेण्यात येणार आहेत. या काळात क्रूझची कार्यक्षमता, प्रवाशांच्या सुरक्षिततेची व्यवस्था आणि अन्य सुविधांची तपासणी केली जाणार आहे. मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांनी समाजमाध्यमांवरील पोस्टद्वारे चाचणी फेरी सुरू झाल्याची माहिती दिली. तसेच सोनिया विहार ते जगतपूर या मार्गाची पाहणी करून संबंधित अधिकाऱ्यांना स्वच्छता, सुरक्षा आणि प्रवाशांच्या सोयींना प्राधान्य देण्याच्या सूचना दिल्या. छठ उत्सवापूर्वी ही सेवा सर्वसामान्यांसाठी सुरू करण्याचा सरकारचा प्रयत्न आहे. त्यामुळे नागरिकांना कुटुंबीयांसह यमुना नदीच्या परिसरात भेट देऊन जलपर्यटनाचा आनंद घेता येऊ शकणार आहे. मात्र, प्रत्यक्ष सेवा सुरू होण्याची तारीख अधिकृत घोषणेनंतरच स्पष्ट होईल.
दिल्लीमध्ये नदीकेंद्रित पर्यटन आणि अंतर्गत जलवाहतुकीला प्रोत्साहन देण्यासाठी हा प्रकल्प राबविण्यात येत आहे. बंदरे, जहाजबांधणी आणि जलमार्ग मंत्रालयाच्या माध्यमातून सोनिया विहार आणि जगतपूरदरम्यान सुमारे सहा ते सात किलोमीटरच्या येण्या-जाण्याच्या मार्गावर आवश्यक सुविधा विकसित करण्याचे काम नियोजित आहे. भारतीय अंतर्देशीय जलमार्ग प्राधिकरणानेही या प्रकल्पासाठी दिल्ली सरकारच्या विविध विभागांशी सामंजस्य करार केला आहे. यामध्ये सिंचन आणि पूर नियंत्रण विभाग, दिल्ली विकास प्राधिकरण, दिल्ली जल बोर्ड तसेच दिल्ली पर्यटन आणि वाहतूक विकास महामंडळाचा समावेश आहे. प्रस्तावित जलपर्यटन सेवेसाठी पर्यावरणपूरक इलेक्ट्रिक आणि सौरऊर्जेवर चालणाऱ्या संकरित बोटी वापरण्याची योजना आहे. प्रवाशांच्या सुरक्षेसाठी या बोटींमध्ये जीवरक्षक जॅकेट आणि सार्वजनिक उद्घोषणा प्रणालीसारख्या सुविधा ठेवण्यात येणार आहेत.
दिल्लीतील जगतपूरपासून उत्तर प्रदेशातील प्रयागराजपर्यंत यमुना नदीचा समावेश राष्ट्रीय जलमार्ग ११० मध्ये करण्यात आला आहे. या पार्श्वभूमीवर सुरू होणारी ‘नमो यमुना – रिव्हर सफारी’ दिल्लीच्या पर्यटन क्षेत्रात नवीन पर्याय उपलब्ध करून देण्याच्या दृष्टीने महत्त्वाची ठरणार आहे. चाचणी फेऱ्यांनंतर आवश्यक बाबींचा आढावा घेऊन ही सेवा नागरिकांसाठी सुरू करण्याची पुढील प्रक्रिया राबविण्यात येणार आहे.