चंद्रपूर
attempt to burn कोठारी पोलिस ठाण्याच्या हद्दीत कौटुंबिक वादातून एका संतापलेल्या जावयाने आपल्या वृद्ध सासर्याच्या अंगावर पेट्रोल ओतून त्यांना जिवे मारण्याचा प्रयत्न केल्याची थरारक घटना समोर आली. याप्रकरणी कोठारी पोलिसांनी तत्परता दाखवत आरोपी जावयाविरुद्ध भारतीय न्याय संहितेच्या (बीएनएस) विविध गंभीर कलमांन्वये गुन्हा नोंदवून त्याला बेड्या ठोकल्या आहेत.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कोठारी येथील रहिवासी निखील दिवाकर मावलीकर यांनी कोठारी पोलिस ठाण्यात येऊन तोंडी तक्रार नोंदवली आहे. निखील यांची 34 वर्षीय बहीण दीपिका ही वनविकास महामंडळात राऊड ऑफिसर म्हणून नोकरीला असून, तिचे पती तथा आरोपी राहुल दत्तात्रय रामटेके (38, रा. कोठारी) हा खाजगी ठेकेदारीचे काम करतो. दीपिका गेल्या सात-आठ महिन्यांपासून प्रसूती रजेवर माहेरी कोठारी येथे राहत होत्या. दरम्यान, गत 31 ऑगस्ट 2026 रोजी दीपिका या पतीकडे गेल्या असता, व्हॉट्सअॅपचे स्टेटस का पाहिले नाही या क्षुल्लक कारणावरून राहुल रामटेके याने त्यांच्याशी भांडण करून मारहाण केली होती. याप्रकरणी निखील हे सोडवायला गेले असता आरोपी राहुलने त्यांच्या मानेवर धारदार शस्त्राने वार करून जखमी केले होते. या घटनेनंतर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाल्यापासून दीपिका या माहेरीच राहत होत्या.
सोमवार, 26 ऑक्टोबर रोजी दुपारी 12 वाजताच्या सुमारास दीपिका या आपले कपडे व सामान आणण्यासाठी पतीच्या घरी गेल्या होत्या. परंतु, आरोपीने कोणतेही सामान देण्यास स्पष्ट नकार दिल्याने दीपिका या माघारी परतल्या. त्यानंतर दुपारी 3 वाजताच्या सुमारास दीपिका व त्यांचे कुटुंबीय घरात असताना, दीपिका यांच्या मोबाईलवर आरोपी राहुलने खून करायला येत आहोत, असा धमकीचा मॅसेज पाठवला. या धमकीनंतर अवघ्या 10 ते 15 मिनिटांतच आरोपीने घराचा गेट उघडून थेट घरात घुसला. यादरम्यान, फिर्यादीचे 65 वर्षीय वडील दिवाकर बाबुराव मावलीकर हे घराच्या पोर्चमधील बाजेवर झोपलेले होते. आरोपीने बाटलीत आणलेले पेट्रोल वृद्ध सासर्याच्या अंगावर ओतले व माचीस काढून पेटवण्याच्या तयारीत असतानाच फिर्यादी निखील आणि त्यांची बहीण दीपिका यांनी धाव घेत त्याला पकडले.
यावेळी शेजारील नातेवाईकांनी आरोपीला पकडून ठेवले. याच संधीचा फायदा घेऊन फिर्यादीने पोलिस ठाण्यात फोन करून घटनेची माहिती दिली. माहितीच्या आधारे कोठारी पोलिस ठाण्याचे पथक घटनास्थळी दाखल झाले आणि त्यांनी आरोपी राहुल रामटेके याला ताब्यात घेतले. याप्रकरणी कोठारी पोलिसांनी फिर्यादीच्या तक्रारीवरून आरोपी राहुल रामटेके याच्या विरूद्ध भारतीय न्याय संहिता (बीएनएस) 2023 च्या कलम 333, 118(1), 115(2), 351(2), 351(3) आणि 109(1) नुसार गुन्हा नोंदवला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलिस उपनिरीक्षक रवींद्र इंगळे करीत आहे.