नागपूर
brown-headed gull नागपूरजवळील कोराडी तलावात तिबेट-मंगोलिया परिसरातून येणारा दुर्मीळ प्रवासी पक्षी ‘ब्राउन-हेडेड गल’ (Brown-headed Gull) आढळून आला आहे. वाइल्डलाइफ वेल्फेअर सोसायटीचे पक्षीनिरीक्षक अमोल आवरकर यांना या पक्ष्याचे दर्शन झाले. कोराडी तलावात या पक्ष्याची यापूर्वी २०१२ मध्ये नोंद झाली होती. त्यामुळे तब्बल १४ वर्षांनंतर त्याचे पुन्हा दर्शन झाल्याने पक्षीप्रेमींमध्ये उत्सुकता निर्माण झाली आहे.
ब्राउन-हेडेड गल हा प्रामुख्याने उत्तर आशियातील तिबेट आणि मंगोलिया परिसरात आढळणारा प्रवासी पक्षी आहे. हिवाळ्यात तो स्थलांतर करून भारतात येतो. या पक्ष्याचे कोराडी तलावातील पुनरागमन येथील जैवविविधतेच्या दृष्टीने महत्त्वाचे मानले जात आहे.
कोराडी तलाव परिसरात रेड-क्रेस्टेड पोचार्ड, गडवाल, पाईड कुकू तसेच विविध प्रकारचे वॉटरबर्ड्स आणि शोरबर्ड्स आढळतात. त्यामुळे हा तलाव पक्षीनिरीक्षकांसाठी महत्त्वाचे ठिकाण ठरत आहे.
तलावाच्या अधिवासावर मानवी हस्तक्षेपाचे सावट
दरम्यान, तलाव परिसरातील वाढते प्लॉटिंग, मानवी वर्दळ आणि वृक्षतोड यामुळे पक्ष्यांच्या नैसर्गिक अधिवासाला धोका निर्माण होत असल्याची चिंता पक्षीप्रेमींनी व्यक्त केली आहे. पाणथळ क्षेत्रांचे संवर्धन, परिसरातील वृक्षांचे संरक्षण आणि मानवी हस्तक्षेपावर नियंत्रण ठेवणे आवश्यक आहे.प्रवासी पक्ष्यांचे आगमन हे तलावाच्या पर्यावरणीय महत्त्वाची जाणीव करून देते. त्यामुळे कोराडी तलावातील जैवविविधता टिकवण्यासाठी प्रशासन आणि नागरिकांनी एकत्रितपणे प्रयत्न करण्याची गरज आहे.