आचरणातून हिंदुत्वाचे दर्शन व्हावे: रत्नपारखी

तरोडा शाखेचा विजयादशमी उत्सव साजरा

    दिनांक :27-Oct-2026
Total Views |
तरोडा,
ratnaparkhi हिंदू धर्म हा केवळ विचार किंवा बोलण्यापुरता मर्यादित नसून तो आपल्या आचरणातून दिसून आला पाहिजे. आपल्या आचरणातून हिंदुत्वाचे दर्शन घडले पाहिजे. जात-पात, भेदभाव आणि सामाजिक दुरावा दूर करून समाजात समरसता निर्माण करण्यासाठी प्रत्येकाने प्रयत्न करणे आवश्यक आहे, असे प्रतिपादन राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे अमरावती विभाग कार्यवाह दत्तात्रय रत्नपारखी यांनी केले. राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, तरोडा शाखेच्या बाजार चौक येथे आयोजित विजयादशमी उत्सवात ते बोलत होते. यावेळी प्रमुख अतिथी म्हणून येथील प्रतिष्ठीत शेतकरी अशोक गोटेकर होते. व्यासपीठावर उपखंड कार्यवाह आशिष लांडगे यांची उपस्थिती होती.
 
 
ratnaparkhi
 
रत्नपारखी पुढे म्हणाले, देशाला व समाजाला संघटित करायचे असेल तर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे अमूल्य योगदान आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने प्रत्येकाच्या मनात देशभक्तीची भावना जागृत केलेली आहे. देशाप्रती आपले कर्तव्य असले पाहिजे. भारत मातेचा आदर असला पाहिजे हे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या प्रेरणेतून मिळते. सर्वांना एकसारखी वागणूक द्यावे हे संघाने शिकविले आहे. म्हणूनच पंचसूत्रीमध्ये सामाजिक समरसतेचे महत्त्व अनन्यसाधारण आहे. यासाठी प्रत्येकाने सजग राहणे गरजेचे आहे. हिंदू समाजाने आपल्या परंपरा, संस्कार आणि संस्कृतीचे जतन करताना सामाजिक जबाबदारीची जाणीव ठेवली पाहिजे. राष्ट्रहिताला प्राधान्य देत समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी योगदान देणे ही प्रत्येकाची जबाबदारी आहे, असेही त्यांनी नमूद केले.
 
 
विजयादशमी हा सत्याचा असत्यावरील विजय आणि चांगुलपणाच्या विजयाची प्रेरणा देणारा सण आहे. या दिवसाचे औचित्य साधून समाजात एकता, शिस्त, बंधुभाव आणि राष्ट्रप्रेमाची भावना अधिक दृढ करण्याचा संकल्प उपस्थितांनी केला. सुरुवातीला सुभाषित विनोद अवचट, वैयक्तिक गीत राजू उघडे, अमृत वचन सुनील हुलके यांनी केले. प्रास्ताविक, परिचय व आभार प्रदर्शन मिलिंद वैद्य यांनी केले. कार्यक्रमाला शहरातील स्वयंसेवक तसेच बंधू-भगिनींनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.