लॉस एंजिलीस
instagram videos डिजिटल मनोरंजनाच्या जगात आपले स्थान अधिक मजबूत करण्यासाठी लोकप्रिय सोशल मीडिया प्लॅटफॉर्म 'इन्स्टाग्राम' एका मोठ्या नव्या वैशिष्ट्याची चाचणी घेत आहे. इन्स्टाग्राम आता आपल्या प्लॅटफॉर्मवर पॉडकास्ट आणि इतर मोठे व्हिडीओ पाहण्याची सुविधा आणण्याच्या तयारीत आहे. याच उद्देशाने कंपनीने तब्बल ९० मिनिटांपर्यंतचे आडवे व्हिडीओ अपलोड करण्याची विशेष चाचणी सुरू केली आहे.
सोमवारी इन्स्टाग्रामने जाहीर केले की, सध्या अमेरिकेतील काही निवडक कंटेंट क्रिएटर्ससोबत ९० मिनिटांच्या लांब व्हिडीओंची चाचणी घेतली जात आहे. या नव्या सुविधेला कंपनीने 'फचर्स' असे नाव दिले आहे. विशेषतः पॉडकास्ट बनवणारे, कॉमेडी कलाकार आणि दीर्घ स्वरूपाचा मजकूर तयार करणाऱ्या क्रिएटर्ससाठी हे फिचर अत्यंत उपयुक्त ठरणार आहे. या नव्या सुविधेमुळे युजर्सना छोट्या रील्सवरूनथेट मुख्य लांब व्हिडिओवर जाण्याचा सहज पर्याय मिळणार आहे. सध्या इन्स्टाग्रामवर रील्सची मर्यादा साधारणपणे ३ मिनिटे किंवा त्यापेक्षा कमी असते.
रील्स बघता बघता पाहता येणार संपूर्ण पॉडकास्ट!
या नव्या सुविधेमागील हे स्पष्ट करताना इन्स्टाग्रामच्या प्रॉडक्ट व्हॉइस प्रेसिडेंट (VP) टेसा लियॉन्स यांनी म्हटले, "आता जर एखाद्या युजरला एखाद्या आवडत्या पॉडकास्टची लहान क्लिप (रिल) बघायला मिळाली, तर तो तिथेच एका क्लिकवर तो पूर्ण व्हिडिओ पाहू शकेल. क्रिएटर्सना त्यांच्या शॉर्ट रील्सना मुख्य लांब व्हिडिओशी जोडता येणार असल्यामुळे प्रेक्षकांना एकाच क्लिकवर संपूर्ण कंटेंट पाहण्याचा उत्तम अनुभव मिळेल."
ब्राझिलनंतर अमेरिकेत विस्तार; 'एक्सप्लोर' पेजवर झळकणार व्हिडिओ
इन्स्टाग्रामने या नवीन फिचरची पहिली चाचणी यापूर्वी ब्राझिलमधील क्रिएटर्ससोबत यशस्वीरीत्या केली होती. आता अमेरिकेतील हजारो क्रिएटर्सपर्यंत याचा विस्तार करण्याची कंपनीची योजना आहे. हे लांब व्हिडिओ युजर्सना इन्स्टाग्रामच्या 'एक्सप्लोर' (Explore) पेजवर तसेच फीडमध्ये शिफारस (Recommend) म्हणून दाखवले जातील. या चाचणीमध्ये अनेक प्रसिद्ध चेहरे सहभागी झाले आहेत; ज्यामध्ये पॉडकास्ट होस्ट आणि स्किम्सच्या सह-संस्थापक एम्मा ग्रेड (Emma Grede), फॅशन-ब्युटी क्रिएटर मोनेट मॅकमायकल, न्यूयॉर्कमधील लोकांच्या प्रेमावर मुलाखती घेणारे प्रेस्टन राकोव्हस्की (Preston Rakovsky) आणि फुटबॉल कंटेंट क्रिएटर डोनाल्ड डी ला हाये यांचा समावेश आहे.
फक्त मोबाईलवरच नाही, तर आता टीव्हीवरही पाहता येणार इन्स्टाग्राम व्हिडिओ!
हे 'फचर्स' सध्या मोबाईल ॲपवर उपलब्ध केले जात असले, तरी युजर्सना घरातील मोठ्या स्क्रीनवर (Smart TV) व्हिडिओ पाहण्याचा निवांत अनुभव देणे हा इन्स्टाग्रामचा मुख्य हेतू आहे. गेल्या वर्षी इन्स्टाग्रामने सॅमसंग, फायर टीव्ही आणि गुगल टीव्हीसाठी 'Instagram for TV' लाँच केले होते. आता हा अनुभव अधिक व्यापक करत अमेरिकेत 'ॲपल टीव्ही' (Apple TV) वरही त्याचे विस्तार करण्यात येत आहे. इन्स्टाग्रामचा हा धोरणात्मक निर्णय थेट 'युट्यूब'सारख्या प्रस्थापित व्हिडिओ स्ट्रीमिंग दिग्गजांना तगडी टक्कर देणारा मानला जात आहे.