अनिल कांबळे
नागपूर,
Nagpur Crime घरात कुणी नसल्याची संधी साधून तरुणीला तिचा प्रियकर आणि मित्र भेटायला आला. अचानक तरुणीचा मामा घरी आला. तेव्हा तरुणीला प्रियकराच्या मिठीत बघितल्यानंतर त्याने जाब विचारला. तरुणीच्या प्रियकराने साथिदारांच्या मदतीने मामा व मामीवर हल्ला केला. केलेल्या हल्ल्यात व्यक्तीच्या डाव्या डोळ्याजवळ दुखापत झाली. ही घटना २४ ऑक्टोबरला रात्री साडेअकराच्या सुमारास प्रतापनगर परिसरातील बंडू सोनी लेआउटमध्ये घडली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, एक १८ वर्षीय तरुणी निकिता (बदललेले नाव) शिक्षण घेण्यासाठी मामाकडे आली होती. शनिवारी नातेवाईकाकडे हळदीचा कार्यक्रम असल्यामुळे निकिताचे मामा-मामी हळदीच्या कार्यक्रमाला गेले होते. घरात कुणी नसल्यामुळे निकिताने आपल्या प्रियकराला घरी बोलावले. तो आपल्या मित्राला घेऊन तिच्या घरी पोहचला. मित्र पाळतीवर होता तर तो युवक निकिताच्या हातात हात घालून गप्पा करीत होता. रात्री साडेअकरा वाजता मामा आणि मामी घरी पोहचले. त्यावेळी निकिता दोन तरुणांसोबत दिसली. त्यांनी दोन्ही तरुणांना दमदाटी करीत शिवीगाळ केली. त्यामुळे चिडलेल्या निकिताच्या प्रियकराने मामावर लाकडी दांड्याने हल्ला केला. पतीचा बचाव करण्यासाठी मामीने धाव घेतली. दोन्ही तरुणांनी मामीलाही लाथाबुक्क्यांनी मारहाण केल्याचा आरोप आहे. पत्नीला वाचविण्यासाठी मामा पुन्हा उठला असता एका तरुणाने लाकडी दांड्याने मामाच्या डाव्या डोळ्याजवळ प्रहार केला. तसेच मामीच्या हातावरही मारहाण करण्यात आली. त्यानंतर आरोपी दुचाकीवरून घटनास्थळावरून पसार झाले. जखमी मामाला उपचारासाठी नागपूरच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात (मेडिकल) दाखल करण्यात आले. या प्रकरणी तक्रारीच्या आधारे प्रतापनगर पोलिसांनी भारतीय न्याय संहितेच्या संबंधित कलमांनुसार गुन्हा दाखल केला आहे.