अनिल कांबळे
कंपनीला व्हॉट्सॲपवरून ४.४५ कोटींचा गंडा
नागपूर,
Mule Account Racket सायबर गुन्हेगारांना फसवणुकीची रक्कम वळती करण्यासाठी बँक खाती उपलब्ध करून देणाऱ्या म्यूल अकाउंट रॅकेटचा सायबर पोलिसांनी पर्दाफाश केला आहे. या प्रकरणात ११ आरोपींना अटक करण्यात आली असून, तपासात महाराष्ट्रासह विविध राज्यांतील ३८८ सायबर फसवणुकीच्या तक्रारींशी संबंधित तब्बल १०३ कोटी १३ लाख ९४ हजार ४५८ रुपयांचे व्यवहार समोर आले आहेत. दरम्यान, अन्य दोन प्रकरणांत एका पीडिताचे ८० लाख रुपये परत मिळविण्यात पोलिसांना यश आले असून, दुसऱ्या प्रकरणातील १.३० कोटी रुपये संबंधित बँक खात्यात गोठविण्यात आले आहेत.
सदर येथील केसर इंडिया लिमिटेड या कंपनीतील फसवणुकीच्या प्रकरणात आरोपीने मोबाइल हॅक करून कंपनीच्या संचालकाचा फोटो असलेल्या व्हॉट्सॲप खात्याचा वापर केल्याचा आरोप आहे. या खात्यावरून कंपनीच्या लेखापालाशी संपर्क साधून बँक खात्यातील शिल्लक रकमेची माहिती मागविण्यात आली. त्यानंतर मुंबईतील एका बँक खात्यात तातडीने ४.४५ कोटी रुपये आरटीजीएसद्वारे पाठविण्याची सूचना देण्यात आली. संचालकाचाच संदेश असल्याचे समजून लेखापालाने रक्कम हस्तांतरित केली. मात्र, नंतर संचालकाशी प्रत्यक्ष संपर्क साधल्यानंतर फसवणूक झाल्याचे उघड झाले. या प्रकरणाच्या तपासात १२ आरोपींना अटक करण्यात आली असून, तक्रारदाराचे ८० लाख रुपये परत मिळविण्यात यश आले आहे. आरोपींविरुद्ध न्यायालयात आरोपपत्रही दाखल करण्यात आले आहे.
व्हॉट्सॲपवरील संदेशाने १.३० कोटींची फसवणूक
दुसऱ्या प्रकरणात अमित प्रदीप घाटे यांना त्यांच्या मालकाचा फोटो असलेल्या व्हॉट्सॲप क्रमांकावरून पैसे हस्तांतरित करण्याचा संदेश मिळाला. मालकाचीच सूचना असल्याचे समजून त्यांनी आरटीजीएसद्वारे १.३० कोटी रुपये संबंधित खात्यात पाठविले. नंतर मालकाशी संपर्क साधल्यानंतर फसवणूक झाल्याचे लक्षात आले. तक्रारीनंतर सायबर पोलिसांनी संपूर्ण १.३० कोटी रुपयांची रक्कम लाभार्थी बँक खात्यात गोठविली आहे. आवश्यक न्यायालयीन प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर ही रक्कम तक्रारदाराला परत मिळणार आहे.
खात्यांच्या साखळीतून पैशांची विल्हेवाट
गोपनीय माहितीच्या Mule Account Racket आधारे पोलिसांनी म्यूल अकाउंट रॅकेटचा तपास सुरू केला. आरोपी संगनमताने सायबर फसवणुकीतून मिळालेली रक्कम विविध बँक खात्यांत स्वीकारून पुढे हस्तांतरित करीत असल्याचा आरोप आहे. अनेक खात्यांच्या साखळीचा वापर करून पैशांचा माग काढणे कठीण केले जात होते. या नेटवर्कशी संबंधित ३८८ तक्रारींमध्ये १०३.१३ कोटी रुपयांचे व्यवहार समोर आले आहेत.
हजारो तक्रारींवर प्रक्रिया
सायबर पोलिसांनी एमआरएम यंत्रणेंतर्गत प्राप्त १०,७७४ विनंत्यांपैकी ७,०२८ विनंत्यांवर कारवाई केली आहे. या प्रक्रियेत ३ कोटी २० लाख ६८ हजार १३२ रुपये पुनर्स्थापित करण्यात आले, तर १ कोटी ७५ लाख ३ हजार ७१५ रुपये पीडितांना परत करण्यात आले आहेत. उर्वरित रक्कम परत करण्याची प्रक्रिया सुरू आहे. जीआरएम यंत्रणेंतर्गत प्राप्त ९८८ विनंत्यांपैकी ८६१ विनंत्यांवर कारवाई करण्यात आली आहे.
.
नागरिक आणि व्यावसायिकांनी आर्थिक व्यवहारांबाबत सतर्क राहावे. व्हॉट्सॲपवर परिचित व्यक्तीचे नाव किंवा छायाचित्र असलेल्या खात्यावरून तातडीने पैसे पाठविण्याची सूचना आल्यास, संबंधित व्यक्तीशी स्वतंत्र माध्यमातून प्रत्यक्ष संपर्क साधून खात्री करावी.
- महक स्वामी (पोलिस उपायुक्त, सायबर गुन्हे)