अनिल कांबळे
नागपूर
Fake Currency भाड्याच्या घरात ५०० रुपयांच्या बनावट नोटां छापल्याप्रकरणी फरार असलेल्या पुष्पम कृष्णा बंडाने (२९) याला वाठोडा पोलिसांनी अटक केली. न्यायालयाने त्याला २९ ऑक्टोबरपर्यंत चार दिवसांची पोलिस कोठडी सुनावली. आरोपी हा नोटांसारखे कागद छापण्यासाठी साहित्य कुठून आणत होता?, या प्रकारात आणखी कोणाचा सहभाग आहे? आणि या रॅकेटचे जाळे किती मोठे आहे?, याचा तपास पोलिस करीत आहेत.
वाठोडा परिसरातील थ्री स्टार को-ऑपरेटिव्ह सोसायटीतील प्लॉट क्रमांक १८ वर असलेल्या घरात हा प्रकार उघडकीस आला. जिल्हा परिषदेचे उपशिक्षणाधिकारी रमेश गंगाधर हरडे (५५, रा. राधाकृष्ण पॅलेस, नरहरीनगर, मानेवाडा-बेसा मार्ग) यांच्या मालकीचे हे घर आहे. त्यांनी २६ सप्टेंबर २०२५ पासून पहिल्या मजल्यावरील हॉल, स्वयंपाकघर आणि बेडरूम असलेला भाग पुष्पम बंडाने याला भाड्याने दिला होता. गेल्या दोन महिन्यांपासून भाडे मिळत नसल्याने हरडे हे भाडेकरूशी संपर्क साधण्याचा प्रयत्न करीत होते. मात्र, त्याच्याशी संपर्क होत नव्हता. अखेर २४ ऑक्टोबर २०२६ रोजी सकाळी अकराच्या सुमारास ते भाडे मागण्यासाठी घरावर पोहोचले. मुख्य दरवाजा ठोठावूनही आतून प्रतिसाद मिळाला नाही. भाडेकरूसोबत काही अनुचित प्रकार घडला असावा, अशी शंका आल्याने त्यांनी दुसऱ्या चावीने दरवाजा उघडला.
घरातील सोफ्यावर ५०० रुपयांच्या नोटांसारखे दिसणारे कागद विखुरलेले आढळले. हा प्रकार पाहून त्यांनी पोलिसांना माहिती दिली. त्यानंतर वाठोडा पोलिसांनी घटनास्थळी कारवाई केली. या कारवाईच्या वेळी नोटांसदृश कागदांसह ३७.८३ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आल्याची माहिती आहे. त्यानंतर फरार झालेल्या पुष्पम बंडाने याला अटक करण्यात आली.
८५ लाखांच्या नोटा जप्त
काही कागदांवर ५०० रुपयांच्या Fake Currency नोटांसारखी छपाई दोन्ही बाजूंनी करण्यात आली होती, तर काही कागदांवर केवळ एका बाजूला छपाई होती. प्लास्टिकमध्ये गुंडाळलेली बंडलेही आढळली. दोन्ही बाजूंनी छपाई असलेल्या कागदांचे दर्शनी मूल्य ३७ लाख रुपये, तर एका बाजूने छपाई असलेल्या कागदांचे दर्शनी मूल्य ४८ लाख रुपये असल्याचे सांगण्यात आले. अशा कागदांचे एकूण दर्शनी मूल्य सुमारे ८५ लाख रुपये आहे. मात्र, हे आकडे खऱ्या चलनी नोटांची जप्ती दर्शवत नाहीत. जप्त कागदांचे स्वरूप आणि त्यांची कायदेशीर स्थिती यांची पडताळणी सुरू आहे. याप्रकरणी पुष्पम बंडानेविरुद्ध भारतीय न्याय संहितेच्या कलम १७८, १८० आणि १८१ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. वाठोडा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रमोद पोरे यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील तपास सुरू आहे.