नागपूर पदवीधर मतदारसंघाचा निकाल आज

दुपारी दोननंतर पहिला कल

    दिनांक :27-Oct-2026
Total Views |
नागपूर
nagpur graduate constituency election विधान परिषदेच्या नागपूर विभागीय पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीची मतमोजणी आज, मंगळवारी होणार असून, कोणाच्या गळ्यात आमदारकीची माळ पडणार, याचे चित्र स्पष्ट होणार आहे. नागपूर विभागीय क्रीडा संकुलात सकाळी ८ वाजल्यापासून मतमोजणी प्रक्रियेला सुरुवात झाली . एकूण ३८ उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात असून, त्यांच्या राजकीय भवितव्याचा फैसला आज होणार आहे.
 

nagpur graduate constituency election result today: counting of votes for 38 candidates 
मतमोजणीसाठी ८४ टेबलची व्यवस्था करण्यात आली आहे. सुरुवातीला मतपत्रिकांचे गठ्ठे तयार करण्याची प्रक्रिया पूर्ण केली जाईल. त्यानंतर प्रत्यक्ष मतमोजणी सुरू होणार असून, दुपारी दोननंतर पहिला कल हाती येण्याची शक्यता आहे. रात्री आठ वाजेपर्यंत निकालाचे चित्र स्पष्ट होईल, असा अंदाज व्यक्त केला जात आहे.
पसंतीक्रमानुसार होणार मतमोजणी
पदवीधर मतदारसंघाची निवडणूक पसंतीक्रम पद्धतीने होत असल्याने मतमोजणीची प्रक्रिया टप्प्याटप्प्याने पार पडणार आहे. सर्वप्रथम वैध मतांची निश्चिती करून विजयासाठी आवश्यक मतांचा कोटा ठरविण्यात येईल. पहिल्या पसंतीच्या मतांमध्ये एखाद्या उमेदवाराला हा कोटा प्राप्त झाल्यास त्याला विजयी घोषित केले जाईल.
मात्र, पहिल्या पसंतीच्या मतांमध्ये कोणताही उमेदवार विजयाचा कोटा गाठू शकला नाही, तर दुसऱ्या पसंतीच्या मतांची मोजणी केली जाईल. त्यानंतर आवश्यकतेनुसार पुढील पसंतीक्रमातील मतांची मोजणी सुरू राहील. निर्धारित विजयाचा कोटा पूर्ण करणारा उमेदवार निश्चित होईपर्यंत ही प्रक्रिया सुरू राहणार आहे.
 
 
६४.७६ टक्के मतदान
नागपूर विभागीय पदवीधर मतदारसंघात एकूण २ लाख ५५ हजार ६०३ मतदारांपैकी १ लाख ६५ हजार ५४१ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. त्यामुळे विभागात एकूण ६४.७६ टक्के मतदानाची नोंद झाली आहे.
जिल्हानिहाय मतदानाची टक्केवारी पुढीलप्रमाणे :
- नागपूर – ६०.३० टक्के
- भंडारा – ६७.०७ टक्के
- गोंदिया – ७१.५३ टक्के
- वर्धा – ६८.३७ टक्के
- चंद्रपूर – ७२.५९ टक्के
- गडचिरोली – ७२.९५ टक्के
गडचिरोली जिल्ह्यात सर्वाधिक ७२.९५ टक्के मतदान झाले, तर नागपूर जिल्ह्यात ६०.३० टक्के मतदानाची नोंद झाली. आता मतमोजणीकडे संपूर्ण विभागाचे लक्ष लागले असून, आजच्या निकालातून विधान परिषदेतील नागपूर विभागीय पदवीधर मतदारसंघाचा नवा आमदार कोण असेल, हे स्पष्ट होणार आहे.