पुणे
Pune Graduate पुणे पदवीधर मतदारसंघाच्या मतमोजणी केंद्रावर मतपेट्यांच्या सीलवरून वाद निर्माण झाला आहे. सात ते आठ मतपेट्यांचे सील तुटलेले असल्याचा दावा शरदचंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या उमेदवार हर्षदा देशमुख-जाधव यांच्या प्रतिनिधीने केला. या मुद्द्यावरून निवडणूक अधिकारी आणि उमेदवारांच्या प्रतिनिधींमध्ये वादावादी झाली. सील तुटलेल्या मतपेट्या बाजूला ठेवून उर्वरित मतपेट्यांची पारदर्शक पद्धतीने मतमोजणी करावी, अशी मागणी प्रतिनिधीकडून करण्यात आली आहे.
हर्षदा देशमुख-जाधव यांच्या प्रतिनिधीने मतमोजणी प्रक्रियेवर आक्षेप नोंदवताना सांगितले की, त्यांच्या तक्रारीकडे गांभीर्याने पाहिले जात नसल्याची भावना आहे. अनेक उमेदवारांनीही यासंदर्भात आक्षेप घेतल्याचा दावा त्यांनी केला. सात ते आठ मतपेट्यांचे सील तुटलेले असल्याचे अधिकाऱ्यांच्या निदर्शनास आणून दिल्यानंतर त्यांनी घटनास्थळी पाहणी केली; मात्र त्यानंतर मतमोजणी पुढे सुरू ठेवण्यास सांगितल्याचे प्रतिनिधीने म्हटले.
“या मतपेट्यांमध्ये नेमके कोणाचे मतदान आहे, हे आम्हाला माहीत नाही. ते परमेश्वराला आणि मतदारराजालाच माहीत आहे. मतपेटीचे सील तुटणे ही गंभीर बाब आहे,” अशी भूमिका प्रतिनिधीने मांडली. सील तुटलेल्या मतपेट्या वेगळ्या ठेवून उर्वरित मतपेट्यांची मोजणी करावी, अशी मागणीही त्यांनी केली. मतमोजणीच्या प्रक्रियेत पारदर्शकता राखली जावी आणि या आक्षेपाची योग्य दखल घेतली जावी, असा त्यांचा आग्रह आहे.
पुणे पदवीधर मतदारसंघात भाजपच्या डॉ. स्मिता योगेश जाधव आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या हर्षदा देशमुख-जाधव यांच्यात प्रमुख लढत होत आहे. ठाकरे गटाकडून सुनील मोदी निवडणुकीच्या रिंगणात आहेत. या मतदारसंघात ६२.७८ टक्के मतदान झाले आहे. पात्र पदवीधर मतदारांनी २३ ऑक्टोबर रोजी मतदानाचा हक्क बजावला होता. आता बालेवाडी येथे मतमोजणी सुरू असून, डॉ. स्मिता जाधव आणि हर्षदा देशमुख-जाधव यांच्यापैकी मतदारांचा कौल कोणाला मिळतो, याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.
पुणे पदवीधर मतदारसंघाचा निकाल राज्याच्या राजकीय वातावरणाच्या दृष्टीनेही महत्त्वाचा मानला जात आहे. या निवडणुकीत भाजपला यश मिळेल, अशी चर्चा सुरू असली, तरी निकाल वेगळा लागल्यास मतदारांचा बदलता कल अधोरेखित होऊ शकतो, अशीही शक्यता व्यक्त केली जात आहे. या मतदारसंघात प्रामुख्याने सुशिक्षित आणि उच्चशिक्षित मतदार मतदान करत असल्याने त्यांच्या निर्णयाकडे विशेष लक्ष दिले जात आहे.
दरम्यान, पुणे शिक्षक मतदारसंघाची निवडणूकही राजकीय घडामोडींमुळे चर्चेत राहिली. या जागेसाठी एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेने सुरुवातीला मंगेश चिवटे यांना उमेदवारी दिली होती. मात्र, नंतर त्यांनी माघार घेतली. त्यानंतर शिवसेनेने अपक्ष उमेदवार सचिन सानप यांना पाठिंबा दिला. त्यामुळे या मतदारसंघात भाजप आणि शिवसेनेमध्ये मैत्रीपूर्ण लढत होत आहे.पुणे पदवीधर मतदारसंघाच्या मतमोजणीदरम्यान मतपेट्यांच्या सीलवरून उपस्थित झालेल्या आक्षेपांमुळे निकालाच्या प्रक्रियेबाबत उत्सुकतेसोबतच तणावही निर्माण झाला आहे. या तक्रारींची दखल कशी घेतली जाते आणि अंतिम निकाल काय लागतो, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.