पुणे पदवीधर मतदारसंघाच्या मतमोजणीपूर्वीच गोंधळ

पेन-कागद नेण्यावरून पोलिस आणि उमेदवाराच्या वडिलांमध्ये वाद

    दिनांक :27-Oct-2026
Total Views |
पुणे
Pune Graduate पुणे पदवीधर मतदारसंघाच्या मतमोजणीला सुरुवात होण्यापूर्वीच मतमोजणी केंद्रावर गोंधळाचे वातावरण निर्माण झाले. केंद्रात पेन आणि कागद घेऊन जाण्यास पोलिसांनी मज्जाव केल्याने राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवार हर्षदा देशमुख जाधव यांचे वडील प्रभाकर देशमुख आणि पोलिसांमध्ये वाद झाला. पोलिसांच्या या भूमिकेबद्दल त्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली असून, या प्रकरणी निवडणूक आयोगाकडे तक्रार करण्याचा इशाराही दिला आहे. राज्यातील इतर काही ठिकाणीही मतमोजणीच्या प्रक्रियेदरम्यान वादाचे प्रसंग घडल्याचे समोर आले. सकाळी आठ वाजता मतमोजणी सुरू झाली असून, त्यानंतर काही वेळात निकालाचे कल समोर येण्याची अपेक्षा आहे.
 

Pune Graduate Constituency Vote Counting: Dispute Erupts Over Pen, Paper and Sealed Ballot Boxes 
मतमोजणी केंद्रात पेन आणि कागद नेण्यास परवानगी नाकारल्यामुळे प्रभाकर देशमुख यांनी पोलिसांच्या कार्यपद्धतीवर प्रश्न उपस्थित केले. “पोलिस पेन आणि कागद आत घेऊन जाऊ देत नाहीत, मग आम्ही मतमोजणी नेमकी कशी करायची?” असा सवाल त्यांनी केला. उमेदवारांच्या प्रतिनिधींना पोलिसांकडून सहकार्य मिळत नसल्याचा आरोपही त्यांनी केला. या प्रकाराची निवडणूक आयोगाने दखल घ्यावी आणि हस्तक्षेप करावा, अशी मागणी त्यांनी केली. या संदर्भात आयोगाकडे अधिकृत तक्रार दाखल करणार असल्याचेही देशमुख यांनी स्पष्ट केले. प्रभाकर देशमुख हे पुणे पदवीधर मतदारसंघातील महाविकास आघाडीच्या उमेदवार हर्षदा देशमुख जाधव यांचे वडील आहेत.
दरम्यान, मतपेट्यांच्या सीलवरूनही मतमोजणी केंद्रात आक्षेप नोंदवण्यात आल्याने तणाव वाढला. हर्षदा देशमुख यांच्या काही प्रतिनिधींनी केंद्रात प्रवेश केल्यानंतर त्यांना मतपेट्या दाखवण्यात आल्या. त्यावेळी काही मतपेट्यांवरील सील लावलेल्या तारा तुटलेल्या असल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. यावर प्रतिनिधींनी हरकत घेतली. काही मतपेट्यांना सील नसल्याचाही आरोप करण्यात आला.
या प्रकरणावर निवडणूक आयोगाकडून संबंधित व्हिडिओ दाखवण्यात येईल, असे स्पष्ट करण्यात आले. मात्र, सील तुटलेल्या मतपेट्या बाजूला ठेवून उर्वरित सुरक्षित सील असलेल्या मतपेट्यांची आधी मोजणी करावी, अशी मागणी देशमुख यांच्या बाजूने करण्यात आली. या मुद्द्यावरून काही काळ मतमोजणी केंद्रात तणावपूर्ण परिस्थिती निर्माण झाली होती. सील व्यवस्थित असलेल्या मतपेट्यांची मोजणी प्रथम सुरू करावी, असा आग्रह प्रतिनिधींनी धरला.
दुसरीकडे, अमरावती विभाग शिक्षक मतदारसंघाच्या मतमोजणीची प्रक्रियाही सुरू होती. सुरुवातीच्या टप्प्यात प्रत्येकी २५ मतपत्रिकांचे गठ्ठे तयार करण्यात आले. त्यानंतर दुसऱ्या फेरीला सुरुवात झाली असून, या टप्प्यात १४ मतपेट्यांमधील मतपत्रिका बाहेर काढून त्यांचे गठ्ठे तयार केले जाणार आहेत. एकूण सहा फेऱ्यांमध्ये ही पूर्वतयारी पूर्ण झाल्यानंतर प्रत्यक्ष मतमोजणीला सुरुवात होणार असल्याची माहिती देण्यात आली.