५ हजारांहून अधिक व्यक्तींना मदत
वाशीम,
shyam-sawai रस्ते अपघातातील जखमींना तत्काळ मदत करून त्यांचे प्राण वाचविण्यासाठी उल्लेखनीय सामाजिक कार्य करणारे वाशीम जिल्ह्यातील कारंजा येथील श्याम रामदास सवाई यांची केंद्र शासनाच्या रस्ते परिवहन व महामार्ग मंत्रालयाच्या ‘राहवीर पुरस्कार’ योजनेअंतर्गत पारितोषिकासाठी निवड झाली आहे. त्यांना २५ हजार रुपयांचे पारितोषिक मंजूर करण्यात आले आहे.

श्याम सवाई यांनी सन २००७ पासून रस्ते अपघातातील जखमींना तातडीने मदत करण्याचे कार्य सातत्याने सुरू ठेवले आहे. स्वतः गंभीर अपघाताचा अनुभव घेतल्यानंतर अपघातग्रस्तांना वेळेत वैद्यकीय मदत मिळावी आणि त्यांचे प्राण वाचावेत, या उद्देशाने त्यांनी स्वयंसेवकांच्या माध्यमातून आपत्कालीन मदतकार्य उभारले. ‘वन कॉल, वन सेकंड, न्यू लाइफ अभियान’ या संकल्पनेतून त्यांनी अपघातग्रस्तांना मदत करण्यासाठी विशेष प्रयत्न केले. रस्ते अपघातातील जखमींना तातडीने मदत करणार्या नागरिकांना प्रोत्साहन देणे, सामाजिक जबाबदारीची भावना वाढविणे आणि अपघाती मृत्यूंचे प्रमाण कमी करण्यासाठी जनसहभाग वाढविणे, हा ‘राहवीर’ योजनेचा उद्देश आहे. या योजनेंतर्गत पात्र व्यक्तींना प्रति घटनेसाठी २५ हजार रुपयांपर्यंत पारितोषिक आणि प्रशस्तीपत्र देण्याची तरतूद आहे.
श्याम सवाई यांच्या निःस्वार्थ सामाजिक कार्याची दखल घेत त्यांना मिळालेला हा गौरव इतर नागरिकांसाठीही प्रेरणादायी आहे. रस्ते अपघातातील जखमींना वेळेत मदत करून त्यांचे प्राण वाचविण्यासाठी नागरिकांनी पुढाकार घ्यावा, असे आवाहन परिवहन विभागाच्या वतीने करण्यात आले आहे.