एसटी कर्मचाऱ्यांची दिवाळी यंदा धडाक्यात

८३,००० कर्मचाऱ्यांसाठी राज्य सरकारने घेतला मोठा निर्णय

    दिनांक :27-Oct-2026
Total Views |
मुंबई
st employees महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या (एसटी) तब्बल ८३ हजार अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची यंदाची दिवाळी अत्यंत आनंदात आणि गोड होणार आहे. दिवाळीपूर्वी कर्मचाऱ्यांना वेतन अदा करण्याबाबत परिवहन मंत्री आणि एसटी महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांनी दिलेला शब्द खरा ठरू लागला आहे. मंत्री सरनाईक यांनी केलेल्या सततच्या पाठपुराव्याला मोठे यश आले असून, महाराष्ट्र शासनाने एसटी महामंडळाला सप्टेंबर २०२६ मधील प्रवासी सवलतींच्या प्रतिपूर्तीपोटी तब्बल ३९१.०२ कोटी रुपयांच्या निधी वितरणाला मंजुरी दिली आहे. यासंदर्भातील अधिकृत शासन निर्णय २७ ऑक्टोबर २०२६ रोजी जारी करण्यात आला आहे.

st bus
दिवाळीपूर्वी पगार करण्याचा मार्ग मोकळा...
एसटी महामंडळातील अधिकारी व कर्मचाऱ्यांचे वेतन साधारणपणे दर महिन्याच्या ७ ते १० तारखेदरम्यान दिले जाते. मात्र, यंदा ६ नोव्हेंबरपासून दिवाळी सणाला सुरुवात होत असल्याने, कर्मचाऱ्यांना सणाच्या तोंडावर आर्थिक विवंचनेला सामोरे जावे लागू नये आणि सणापूर्वीच वेतन हातात पडावे, यासाठी परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी एसटी प्रशासनाला तातडीच्या कार्यवाहीचे स्पष्ट निर्देश दिले होते. त्यानुसार परिवहन विभाग आणि एसटी प्रशासनाने वेगाने पाठपुरावा करत हा निधी मिळवून घेतला आहे.
एसटी महामंडळाकडून महिला सन्मान योजना, ज्येष्ठ नागरिकांसह विविध समाजोपयोगी प्रवासी सवलतींची यशस्वी अंमलबजावणी केली जाते. या सवलतीपोटी शासनाकडून मिळणारी प्रतिपूर्तीची रक्कम महामंडळाच्या आर्थिक नियोजनाचा कणा आहे. हा निधी वेळेत उपलब्ध झाल्यामुळे महामंडळाच्या दैनंदिन आर्थिक व्यवहारांना गती मिळण्यास मोठी मदत होते. शासनाच्या या महत्त्वपूर्ण निर्णयामुळे एसटी कर्मचाऱ्यांच्या दिवाळीपूर्व वेतनासाठीचा निधी मिळण्याचा मुख्य अडथळा दूर झाला आहे.