मुंबई
hrithik roshan बॉलिवूड अभिनेता हृतिक रोशन आणि सुझान खान ही एकेकाळी लोकप्रिय जोडी म्हणून ओळखली जात होती. २००० मध्ये विवाहबंधनात अडकलेल्या या दोघांनी १४ वर्षांच्या संसारानंतर २०१४ मध्ये घटस्फोट घेण्याचा निर्णय घेतला. त्यांच्या विभक्त होण्याच्या बातमीने चाहत्यांना मोठा धक्का बसला होता. मात्र, वैवाहिक नातं संपल्यानंतरही हृतिक आणि सुझान यांनी एकमेकांशी असलेलं मैत्रीचं नातं जपलं. आज दोघेही आपापल्या आयुष्यात पुढे गेले असून, आपल्या वैयक्तिक आयुष्यात आनंदी आहेत. नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत सुझानने तिचं सध्याचं नातं, हृतिकची गर्लफ्रेंड सबा आझाद आणि मुलांच्या संगोपनाविषयी मनमोकळेपणाने भाष्य केलं आहे.
हृतिकपासून घटस्फोट घेतल्यानंतर सुझान खानच्या आयुष्यात अभिनेता अर्सलान गोनी याची एण्ट्री झाली. सध्या दोघेही रिलेशनशिपमध्ये असून, अर्सलानसोबतच्या नात्याबद्दल सुझानने समाधान व्यक्त केलं आहे. अर्सलान तिच्या आयुष्यात योग्य वेळी आला, असं तिला वाटतं. त्या काळात दोघांनाही प्रेमाची आणि एकमेकांच्या साथीची गरज होती, असंही तिने सांगितलं.
अर्सलानच्या आयुष्यात येण्यामुळे आपण स्वतःला भाग्यवान समजत असल्याचं सुझानने स्पष्ट केलं. तिच्या मते, अर्सलान हा एक उत्तम व्यक्ती आहे. त्याच्या साथीमुळे तिच्या आयुष्यात प्रेम आणि आनंद आला आहे. आयुष्यात कितीही अडचणी आल्या, तरी एकमेकांची साथ सोडायची नाही, असा निर्धार दोघांनी केला असल्याचं तिने सांगितलं.
सुझानने त्यांच्या नात्यातील समजूतदारपणाविषयीही भाष्य केलं. ती म्हणाली, “परिस्थिती कशीही असली, तरी आपण आपल्या क्षमतेनुसार आयुष्य सर्वोत्तम पद्धतीने जगायचं, असं आम्ही एकमेकांना नेहमी सांगतो. आमचा हा निर्धार ठाम आहे. आमच्या वाटेत कितीही आव्हानं आली, तरी आम्ही एकमेकांच्या पाठीशी उभे राहतो. माझ्या मते, हीच सर्वांत महत्त्वाची गोष्ट आहे.”
अर्सलानसोबतच्या नात्याबद्दल आपण पूर्णपणे निश्चिंत असल्याचंही सुझानने सांगितलं. आपली कारकीर्द चांगली सुरू आहे, आपली मुलं उत्तम आहेत आणि सध्याचं आयुष्य ज्या पद्धतीने पुढे जात आहे, त्यात आपण पूर्णपणे समाधानी असल्याचं तिने नमूद केलं.
दरम्यान, हृतिक रोशन सध्या अभिनेत्री आणि गायिका सबा आझाद हिला डेट करत आहे. हृतिक आणि सबाच्या नात्याबद्दल सुझानने सकारात्मक भूमिका मांडली. सबा ही अतिशय चांगली व्यक्ती असल्याचं सांगत, तिच्यासारखी जोडीदार मिळाल्यामुळे हृतिक खरोखरच नशीबवान असल्याचं मत तिने व्यक्त केलं. सुझानच्या या विधानामुळे घटस्फोटानंतरही हृतिक आणि तिच्यात असलेलं मैत्रीपूर्ण नातं पुन्हा चर्चेत आलं आहे.
हृतिक आणि सुझान यांनी विभक्त झाल्यानंतरही एकमेकांच्या वैयक्तिक आयुष्याचा आदर कायम राखला आहे. दोघेही आपल्या सध्याच्या नात्यांमध्ये आनंदी असल्याचं सुझानच्या वक्तव्यावरून स्पष्ट होतं. घटस्फोटानंतर आयुष्यात पुढे जाताना त्यांनी परस्परांबद्दलचा आदर आणि समजूतदारपणा जपला आहे.
हृतिक आणि सुझान यांना हृहान आणि हृदान ही दोन मुलं आहेत. घटस्फोटानंतरही दोघे मिळून मुलांचा सांभाळ करत आहेत. मुलांचं सुख, त्यांचं भविष्य आणि त्यांचं संगोपन यांना प्राधान्य देत हृतिक आणि सुझान यांनी पालक म्हणून आपली जबाबदारी कायम जपली आहे. वैवाहिक नातं संपल्यानंतरही मुलांसाठी एकत्रितपणे जबाबदारी पार पाडण्याचा त्यांचा दृष्टिकोन लक्षवेधी ठरत आहे.