चेन्नई
Tamil Nadu Liquor तामिळनाडूमध्ये मद्य खरेदी करणाऱ्या ग्राहकांसाठी नवा नियम लागू करण्यात येणार आहे. तामिळनाडू राज्य विपणन महामंडळाने (टासमॅक) १ नोव्हेंबरपासून किरकोळ मद्यविक्री दुकानांमध्ये एक हजार रुपयांपेक्षा अधिक किमतीच्या खरेदीसाठी डिजिटल पेमेंट अनिवार्य केले आहे. या नियमानुसार ग्राहकांना यूपीआय, डेबिट कार्ड किंवा क्रेडिट कार्डच्या माध्यमातून पैसे भरता येतील. मात्र, एक हजार रुपयांपर्यंतच्या खरेदीसाठी रोख किंवा डिजिटल, अशा दोन्ही पद्धतींनी पैसे भरण्याची मुभा असेल.
टासमॅकच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने मंगळवारी अधिकृत परिपत्रकाचा हवाला देत या निर्णयाची माहिती दिली. राज्यात सध्या टासमॅकची ४ हजार ४८ किरकोळ मद्यविक्री दुकाने सुरू आहेत. या दुकानांमध्ये यूपीआय तसेच डेबिट आणि क्रेडिट कार्डद्वारे पैसे भरण्याची सुविधा आधीपासून उपलब्ध आहे. मात्र, बहुतांश व्यवहार अद्याप रोख स्वरूपातच होत असल्याचे अधिकाऱ्याने सांगितले.
दुकानांमध्ये दररोज मोठ्या प्रमाणात रोख रक्कम हाताळावी लागत असल्याने कर्मचाऱ्यांना अनेक अडचणींचा सामना करावा लागतो. रोख रक्कम वाहून नेताना सुरक्षेचा धोका, हिशेबातील तफावत आणि बनावट नोटांचा प्रश्न यांचा त्यात समावेश आहे. याशिवाय, मद्याच्या छापील कमाल किरकोळ किमतीपेक्षा (एमआरपी) अधिक पैसे आकारले जात असल्याच्या तक्रारीही प्रशासनाकडे वारंवार आल्या आहेत. डिजिटल पेमेंटमुळे प्रत्येक व्यवहाराची वेळ आणि रक्कम नोंदवली जाईल. त्यामुळे ग्राहकांकडून निर्धारित किमतीपेक्षा अधिक पैसे आकारण्याच्या प्रकारांवर नियंत्रण ठेवण्यास मदत होईल, असा प्रशासनाचा विश्वास आहे.
नव्या व्यवस्थेनुसार, मद्यविक्रीतून Tamil Nadu Liquor मिळणारी रक्कम थेट टासमॅकच्या अधिकृत बँक खात्यांमध्ये जमा होईल. तसेच, ग्राहकांकडून कर्मचाऱ्यांचे वैयक्तिक क्यूआर कोड किंवा वैयक्तिक बँक खात्यांद्वारे पैसे स्वीकारण्यास बंदी घालण्यात आली आहे. एक हजार रुपयांपेक्षा अधिक किमतीच्या प्रत्येक खरेदीसाठी अधिकृत डिजिटल माध्यमांचा वापर करणे बंधनकारक असेल.
या नियमांचे उल्लंघन करणाऱ्या कर्मचाऱ्यांवर कठोर शिस्तभंगाची कारवाई केली जाणार आहे. प्रत्येक खरेदीसाठी ग्राहकाला छापील पावती देणे आणि अधिकृत विक्री केंद्रातील पॉइंट ऑफ सेल (पीओएस) मशीनवर व्यवहाराची पुष्टी झाल्यानंतरच मद्याच्या बाटल्या ग्राहकांच्या ताब्यात देणे, अशा सूचना दुकानांच्या पर्यवेक्षकांना देण्यात आल्या आहेत. नव्या नियमांची माहिती ग्राहकांपर्यंत पोहोचवण्यासाठी सर्व दुकानांमध्ये दोन बाय तीन फुटांचे माहिती फलक लावले जाणार आहेत.
दरम्यान, या व्यवस्थेची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी जिल्हा व्यवस्थापकांना पीओएस मशीनची तपासणी करणे, नेटवर्क कनेक्टिव्हिटी सुरळीत असल्याची खात्री करणे आणि अंमलबजावणीचा आढावा घेण्यासाठी साप्ताहिक बैठका घेण्याची जबाबदारी देण्यात आली आहे. या बदलामुळे मद्यविक्रीतील व्यवहार अधिक पारदर्शक करण्यास आणि अतिरिक्त पैसे आकारण्याच्या तक्रारींवर नियंत्रण मिळवण्यास मदत होण्याची अपेक्षा आहे.