मराठी माणसातील संकुचित वृत्ती नष्ट व्हावी

पुरस्कारप्राप्त ज्येष्ठ साहित्यिक पद्मश्री डॉ. भालचंद्र नेमाडे

    दिनांक :27-Oct-2026
Total Views |

नागपूर,

padmashri dr bhalchandra nemade मराठी साहित्यिकांनी प्राचीन काळापासून भाषा आणि संस्कृतीचा देशभर विस्तार केला. इतर भारतीय भाषांच्या समृद्धीतही मराठी साहित्यिकांचे महत्त्वपूर्ण योगदान राहिले आहे. मात्र, मराठी माणसाच्या संकुचित वृत्तीमुळे मराठी भाषेचे अवमूल्यन झाले. ही वृत्ती नष्ट करून आपला साहित्यिक आणि सांस्कृतिक इतिहास स्वाभिमानाने सांगण्याची गरज आहे, असे परखड प्रतिपादन ज्ञानपीठ पुरस्कारप्राप्त ज्येष्ठ साहित्यिक पद्मश्री डॉ. भालचंद्र नेमाडे यांनी केले.

 
 
padmashri dr bhalchandra nemade
 
 
विदर्भ सांस्कृतिक प्रबोधिनी आणि स्पंदन कल्याणकारी बहुउद्देशीय संस्थेच्या वतीने सोमवारी आयोजित कार्यक्रमात डॉ. नेमाडे यांचा हृद्य सत्कार करण्यात आला. यावेळी स्पंदन संस्थेच्या राज्यस्तरीय पुरस्कारांचे वितरणही त्यांच्या हस्ते झाले. ‘मराठी भाषेची सद्यःस्थिती’ या विषयावर बोलताना त्यांनी मराठीच्या समृद्ध साहित्यपरंपरेपासून ते भाषेसमोरील वर्तमान आव्हानांपर्यंत विविध मुद्यांवर भाष्य केले.
 

डॉ. नेमाडे म्हणाले, गजानन मुक्तिबोध, भागवत साठे, कविश्वर यांच्यासारख्या मराठी साहित्यिकांनी देशातील अन्य भाषांच्या समृद्धीत योगदान दिले. महानुभाव साहित्य देशभर पोहोचविण्यात नागपूरचे डॉ. व्ही. बी. कोलते यांची भूमिका महत्त्वाची ठरली. मराठी साहित्याचा प्रभाव केवळ महाराष्ट्रापुरता मर्यादित नसून त्याची परंपरा व्यापक आहे. त्यामुळे मराठी भाषेचा इतिहास आणि तिचे योगदान मांडताना न्यूनगंड न बाळगता आत्मविश्वासाने पुढे आले पाहिजे. आज आपण ज्या इंग्रजी भाषेचा मोठ्या प्रमाणावर उदोउदो करतो, त्या भाषेचे स्वतंत्र अस्तित्व आकाराला येण्यापूर्वीच महाराष्ट्रात कविता आणि कादंबऱ्यांची समृद्ध परंपरा विकसित झाली होती, असे त्यांनी नमूद केले. मराठी ही अपभ्रंश भाषा असल्याचा समजही मराठीला कमी लेखण्याच्या दृष्टिकोनातून पसरविण्यात आल्याचे मत त्यांनी व्यक्त केले. मराठीच्या भरभराटीत नागपूरचे योगदान अत्यंत महत्त्वाचे असून महाराष्ट्राच्या प्रगतीतही या शहराची भूमिका निर्णायक राहील, अशा शब्दांत डॉ. नेमाडे यांनी नागपूरचा गौरव केला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक स्पंदन संस्थेचे अध्यक्ष पांडुरंग सोनवणे यांनी केले.padmashri dr bhalchandra nemade डॉ. नेमाडे यांच्या सत्कार सोहळ्याचे प्रास्ताविक डॉ. श्रीपाद जोशी यांनी केले. यावेळी डॉ. श्रीपाद जोशी यांचाही डॉ. नेमाडे यांच्या हस्ते ‘कृतार्थ जीवन गौरव’ पुरस्काराने सन्मान करण्यात आला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी डॉ. शरद निंबाळकर होते, तर उद्घाटक म्हणून पद्मश्री डॉ. रवी कोल्हे उपस्थित होते.

पुरस्कारांचे वितरण

 
डॉ. भालचंद्र नेमाडे यांच्या हस्ते दै. तरुण भारतचे मुख्य संपादक शैलेश पांडे, लोकनाथ यशवंत, डॉ. सुभाष गवई, डॉ. प्रफुल्ल शिलेदार, श्याम पेठकर, ज्ञानेश्वर रक्षक, अनिल मालोकर, प्रभाकर आंबोणे, डॉ. बळवंत भोयर, डॉ. नीलकांत कुलसंगे, गुरू कौशल आणि धनराज हरडे यांना ‘स्पंदन संस्कृती-साहित्य कृतार्थ जीवन गौरव’ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. तसेच प्रतापराव वाघमारे, श्रीमंत माने, देवा झिंझाड, सुनीता झाडे, रवींद्र भुयार, कल्याणकुमार डहाट, संजय जीवने, नानू नेवरे आणि सीताराम राऊत यांना ‘स्पंदन साहित्य-संस्कृती गौरव’ पुरस्कार प्रदान करण्यात आले.