प्रवासी वाहनचालकांसाठी कल्याणकारी योजनांचे कवच!

आनंद दिघे साहेब कल्याणकारी मंडळात सभासद नोंदणी करण्याचे आवाहन

    दिनांक :27-Oct-2026
Total Views |
गोंदिया
transport vehicle drivers प्रवासी वाहतूक करणार्‍या वाहनचालक-मालकांना सामाजिक सुरक्षा आणि आर्थिक आधार देण्यासाठी राज्य शासनाकडून धर्मवीर आनंद दिघे साहेब महाराष्ट्र प्रवासी वाहतूक चालक कल्याणकारी मंडळाची स्थापना करण्यात आली आहे. या मंडळाच्या माध्यमातून विविध कल्याणकारी योजना राबविण्यात येणार असून प्रवासी वाहन चालकांना या कल्याणकारी योजनांचा कवच मिळणार आहे. या योजनांचा लाभ घेण्यासाठी जिल्ह्यातील पात्र वाहनचालक-मालकांनी मंडळाचे सभासद होणे गरजेचे आहे.
 
auro
 
राज्य शासनाच्या २४ जुलै २०२४ आणि २० मे २०२६ रोजीच्या शासन निर्णयांनुसार या मंडळाची स्थापना करण्यात आली आहे.
 
प्रवासी वाहतूक क्षेत्रात कार्यरत असलेल्या अनुज्ञप्ती व बॅचधारक वाहनचालक-मालकांचे सामाजिक व आर्थिक कल्याण साधणे, हा मंडळाचा प्रमुख उद्देश आहे. मंडळामार्फत जीवन विमा व अपंगत्व विमा, आरोग्यविषयक लाभ, कर्तव्यावर असताना दुखापत झाल्यास ५० हजार रुपयांपर्यंत अर्थसहाय्य, तसेच पाल्यांच्या शिक्षणासाठी शिष्यवृत्ती अशा योजना राबविण्यात येणार आहेत. यासोबतच वाहनचालकांच्या कौशल्यवृद्धीसाठीही उपक्रम राबविले जाणार आहेत. विशेष म्हणजे, ६५ वर्षांवरील ऑटोरिक्षा व मीटर टॅक्सी परवानाधारकांसाठी निवृत्ती सन्मान योजनेंतर्गत १० हजार रुपयांचे सानुग्रह अनुदान देण्याची तरतूद आहे. तसेच नवीन ऑटोरिक्षा व मीटर टॅक्सी खरेदीसाठी कर्ज आणि शासनाने वेळोवेळी घोषित केलेल्या अन्य कल्याणकारी योजनांचाही लाभ पात्र सभासदांना मिळणार आहे. मंडळाचे सभासद होण्यासाठी.....हे संकेतस्थळ उपलब्ध करून देण्यात आले असून जिल्ह्यातील पात्र प्रवासी वाहनचालक-मालकांनी या संकेतस्थळावर नोंदणी करून योजनांचा लाभ घ्यावा असे आवाहन उपप्रादेशिक परिवहन विभागातर्फे करण्यात आले आहे.
मंडळाच्या माध्यमातून प्रवासी वाहतूक चालकांसाठी विविध कल्याणकारी योजना राबविण्यात येत असून त्यांच्यांसाठी हे एकप्रकारे कवच प्रमाणे आहे. तेव्हा संबंधित यंत्रणा व संस्थांनी या योजनांची माहिती जास्तीत जास्त वाहनचालक-मालकांपर्यंत पोहोचवून त्यांना सभासद नोंदणीसाठी प्रोत्साहित करून सहकार्य करावे.
- विलास चौधरी, उपप्रादेशिक परिवहन अधिकारी, गोंदिया