मालेगाव,
tehsil-office-premises मालेगाव येथील तहसील कार्यालय परिसरातील झाडे तोडण्यात आल्याचा प्रकार समोर आला असून, या प्रकरणाची निष्पक्ष चौकशी करून संबंधित दोषींवर कायदेशीर कारवाई करावी, अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते रिजवान मो. उस्मान यांनी तहसीलदारांकडे निवेदनाद्वारे केली आहे.
तहसील कार्यालयाच्या परिसरातील अंदाजे दोन ते तीन झाडे तोडण्यात आल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे. झाडे तोडल्यानंतर त्यांचे लाकूडही नेण्यात आल्याची माहिती असून, ही झाडे कोणाच्या आदेशाने तोडण्यात आली, त्यासाठी संबंधित सक्षम प्राधिकरणाची परवानगी घेण्यात आली होती का, याबाबत स्पष्टता नसल्याचे त्यांनी म्हटले आहे.शासकीय कार्यालयाच्या परिसरातील झाडे ही सार्वजनिक पर्यावरणाच्या दृष्टीने महत्त्वाची असून, त्यांची तोड करताना नियमांचे पालन होणे आवश्यक आहे. त्यामुळे या प्रकरणात प्रत्यक्ष पाहणी करून तोडण्यात आलेल्या झाडांची संख्या, प्रकार व सद्यस्थितीची नोंद घ्यावी. तसेच झाडे तोडण्याचे आदेश देणारे अधिकारी, संबंधित कर्मचारी, कंत्राटदार आणि जबाबदार व्यक्तींची चौकशी करावी, अशी मागणी करण्यात आली आहे.
तोडलेल्या झाडांचे लाकूड कुठे नेण्यात आले, त्याची विल्हेवाट कशी लावण्यात आली आणि त्यासंदर्भात नोंदी उपलब्ध आहेत का, याचीही तपासणी करण्याची मागणी निवेदनात करण्यात आली आहे. आवश्यक परवानगीशिवाय झाडे तोडल्याचे निष्पन्न झाल्यास संबंधितांवर लागू कायदे व नियमांनुसार कारवाई करावी, असेही निवेदनात म्हटले आहे. या प्रकरणातील चौकशीचा अहवाल आणि केलेल्या कार्यवाहीची माहिती लेखी स्वरूपात द्यावी, अशी विनंती रिजवान उस्मान यांनी केली आहे. निवेदनाच्या प्रती वनमंत्री, जिल्हाधिकारी वाशीम, वनपरिक्षेत्र अधिकारी मालेगाव, पोलिस निरीक्षक मालेगाव तसेच नगरपंचायत प्रशासनासह संबंधित विभागांना पाठविण्यात आल्या आहेत.