संघटित समाजामुळेच राष्ट्र सामर्थ्यशाली : शेखर केळकर

नाचणगाव शाखेचा विजयादशमी उत्सव

    दिनांक :27-Oct-2026
Total Views |
पुलगाव,
vijayadashami देशावर आलेल्या संकटाच्या वेळी समाजाने संघटित होऊन त्या संकटांचा प्रतिकार केला. त्यामुळे समाज संघटित झाल्यास तरच सामर्थ्यशाली राष्ट्राचे निर्माण होईल, असे प्रतिपादन राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे विदर्भ प्रांत व्यवसायी कार्यप्रमुख शेखर केळकर यांनी केले. राष्ट्रीय स्वयंसेवक संघ नाचणगाव शाखेच्या २६ ऑक्टोबर रोजी बाजार चौक येथे आयोजित विजयादशमी उत्सवात ते प्रमुख वक्ते म्हणून बोलत होते. यावेळी सेवानिवृत्त शिक्षण विस्तार अधिकारी व ग्रामगीताचार्य कल्पना बिरे अध्यक्षस्थानी होत्या. व्यासपीठावर खंड संघचालक अरविंद हलमारे उपस्थित होते.
 
vijayadashami
 
ते पुढे म्हणाले, रामायण, महाभारत व बौद्ध तत्त्वज्ञानामध्ये संघशक्तीचे महत्त्व विशद केलेले आहे. स्वामी विवेकानंद, छत्रपती शिवाजी महाराज, स्वातंत्र्यवीर सावरकर यांनी चारित्र्यसंपन्न व बलशाली युवकांच्या संघटनातून सामर्थ्यशाली राष्ट्र निर्मिती होऊ शकते, असे सांगितले. या महापुरुषांचे विचार प्रत्यक्ष आचरणात आणण्यासाठी डॉ. हेडगेवार यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघ सुरू केला. कार्यकर्ता निर्मितीच्या माध्यमातून राष्ट्र बलशाली करण्याचे कार्य अविरत सुरू आहे. आत्मनिर्भर भारताच्या दिशेने देशाची प्रगती सुरू आहे. देशाच्या तरुणाईला सकारात्मक विचार देण्याचे कार्य संघ करीत आहे, या सुंदर कार्यात समाजाने सहभागी व्हावे, असे आवाहन त्यांनी केले. उत्सवापूर्वी नाचणगावच्या प्रमुख मार्गावरून घोष पथकासह पथसंचलन काढण्यात आले. पथसंचलनाचे ठिकठिकाणी गावकऱ्यांनी स्वागत केले. अतिथींचे आगमन झाल्यानंतर त्यांनी शस्त्रपूजन, दंड, योगासने, व्यायाम योग आदी प्रात्यक्षिके सादर करण्यात आली.
 
सांघिक गीत सुरेश हणमंते, अमृत वचन भावेश चौबे, सुभाषित रितेश चौबे, वैयक्तिक गीत सुनील येखंडे यांनी सादर केले. प्रास्ताविक, परिचय व आभार प्रदर्शन खंड कार्यवाह मानसिंग झांझोटे यांनी केले. कार्यक्रमाला गावकरी व मातृशक्ती मोठ्या संख्येने उपस्थित होते.