मुंबई
zee marathi awards मराठी मनोरंजनविश्वातील लोकप्रिय कलाकारांना एकाच मंचावर पाहण्याची संधी देणाऱ्या ‘झी मराठी अवॉर्ड्स २०२६’ या सोहळ्याची प्रेक्षकांमध्ये नेहमीच उत्सुकता असते. कलाकारांचे दमदार परफॉर्मन्स, आकर्षक सादरीकरण आणि पडद्यामागील धमाल यांमुळे हा सोहळा खास ठरतो. केवळ प्रेक्षकच नव्हे, तर कलाकारही या कार्यक्रमासाठी तितकेच उत्सुक असतात. यंदाच्या सोहळ्यात झी मराठीवरील विविध मालिकांमध्ये आईची भूमिका साकारणाऱ्या सात अभिनेत्री एकत्र येऊन विशेष सरप्राईज परफॉर्मन्स सादर करणार आहेत. या परफॉर्मन्सचा भाग असलेल्या अभिनेत्री मेघना एरंडे जोशी यांनी या अनुभवातील मजेशीर प्रसंग आणि पडद्यामागच्या आठवणी सांगितल्या आहेत.
मेघना एरंडे जोशी यांनी सांगितले की, झी मराठी अवॉर्ड्समधील अनुभव अतिशय आनंददायी होता. या विशेष सादरीकरणासाठी वाहिनीवरील विविध मालिकांमधील आईच्या भूमिका साकारणाऱ्या अभिनेत्री एकत्र आल्या होत्या. ‘सनई चौघडे’ मालिकेतील पमा आणि तेजस्विनी, ‘लक्ष्मी निवास’मधील लक्ष्मी, ‘तारिणी’मधील कौशिकी, ‘दीपज्योती’मधील सुलोचना, ‘वीण दोघातली ही तुटेना’मधील मंदाकिनी आणि ‘कृष्णाईच्या लेकी’मधील सत्यभामा अशा सात जणींनी या खास परफॉर्मन्समध्ये सहभाग घेतला होता. सर्वांनी एकत्र येऊन सादर केलेल्या या कार्यक्रमामुळे त्यांना एक वेगळा अनुभव मिळाला.
या परफॉर्मन्ससाठी सर्व अभिनेत्री पारंपरिक वेशभूषेत सजल्या होत्या. मेघना यांनी अनेक वर्षांनंतर नऊवारी साडी नेसली होती. नऊवारी साडी अंगावर टाके घालून नेसवली जात असल्याने ती सहज काढता येत नाही. एकदा साडी व्यवस्थित नेसवल्यानंतर चार ते पाच तास ती तशीच ठेवावी लागते. त्यात पारंपरिक दागिने सांभाळण्याचीही जबाबदारी होती. या सगळ्या अडचणी सांभाळत अभिनेत्रींचा डान्स मात्र उत्तम झाल्याचे मेघना यांनी सांगितले.
या कार्यक्रमादरम्यान घडलेला एक प्रसंगही त्यांनी आवर्जून सांगितला. सुहास, मेघना आणि हर्षदा ताई यांचा परफॉर्मन्स पूर्ण झाल्यानंतर कौशिकी आणि तेजस्विनी यांची स्टेजवर एन्ट्री होणार होती. त्यावेळी स्टेजच्या बाजूला जात असताना मेघना यांचे लक्ष जमिनीवर पडलेल्या फुटलेल्या बांगड्यांच्या काचांकडे गेले. त्या काचा तिथेच पडून असल्याचे पाहताच त्यांनी क्षणाचाही विलंब न करता त्या उचलल्या. डबिंगच्या कामामुळे इंग्रजी चित्रपटांचा प्रभाव असल्याचे सांगताना त्यांना त्या क्षणी ‘द मॅट्रिक्स’ चित्रपटातील निओची आठवण झाली. चित्रपटात निओ ज्या वेगाने फाईट सीन करतो, त्याच वेगाने आपणही एका दमात त्या काचा उचलल्या आणि तिथून निघालो, असे मेघना यांनी हसत सांगितले. कारण त्याच वेळी कौशिकी आणि तेजस्विनी यांचा परफॉर्मन्स सुरू होणार होता.
या प्रसंगामुळे संभाव्य अपघात टळल्याचे समाधानही मेघना यांनी व्यक्त केले. फुटलेल्या काचांमुळे कोणालाही दुखापत झाली नाही, याचा त्यांना विशेष आनंद झाला. आपला परफॉर्मन्स छान झाल्याचा आनंद होताच; मात्र स्टेजवर उपस्थित असलेल्या कोणत्याही कलाकाराला दुखापत होण्याचा धोका टळला, ही बाबही तितकीच महत्त्वाची होती, असे त्यांनी नमूद केले.
कार्यक्रमाच्या आधी बॅकस्टेजवरही कलाकारांची चांगलीच धमाल सुरू होती. आपण सगळ्याच जणी फिल्मी असल्याचे सांगत मेघना यांनी आणखी एक मजेशीर आठवण शेअर केली. स्टेजवर जाण्यापूर्वी सर्वांनी एकत्र प्रार्थना केली. त्यानंतर ‘चक दे! इंडिया’ चित्रपटातील प्रसिद्ध प्रसंगाची आठवण करून देत त्या एकमेकींना ‘बस, वो ७० मिनिटं…’ असे म्हणत होत्या. मात्र, त्यांच्या परफॉर्मन्सचा कालावधी लक्षात घेता त्यांनी त्यात बदल करून ‘बस, वो ५ मिनिटं… जब हमे स्टेजपर जाके परफॉर्म करना है!’ असे म्हणत वातावरण हलकेफुलके केले.
या सगळ्या गमतीजमतींदरम्यान अभिनेत्री एकमेकींसोबत फोटो काढत होत्या, रील्स बनवत होत्या आणि हसत-खेळत कार्यक्रमाचा आनंद घेत होत्या. एकत्र सराव करणे, मंचावर सादरीकरण करणे आणि पडद्यामागील आठवणी जपणे, हा अनुभव सर्वांसाठी खास ठरल्याचे मेघना यांनी सांगितले. ‘झी मराठी अवॉर्ड्स २०२६’मधील या सात अभिनेत्रींच्या विशेष सादरीकरणामुळे मालिकांमधील आईंचे वेगळे रूप प्रेक्षकांना पाहायला मिळणार असून, त्यांच्या या एकत्रित परफॉर्मन्सविषयी उत्सुकता वाढली आहे.