नवी दिल्ली
airfares सामान्यतः दिवाळी आणि सणासुदीच्या काळात प्रवाशांची वाढती गर्दी लक्षात घेऊन सर्वच प्रमुख विमान कंपन्यांकडून देशांतर्गत उड्डाणांची संख्या वाढवली जाते. मात्र, यंदाच्या वर्षी याच्या अगदी उलट चित्र पाहायला मिळत असून विमान प्रवाशांच्या खिशाला मोठा फटका बसत आहे. इंडिगो आणि एअर इंडिया या देशातील अव्वल विमान कंपन्यांनी गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा सणांच्या तोंडावरच आपल्या विमानांची आसन क्षमता कमी केली आहे. यामुळे देशांतर्गत काही महत्त्वाच्या हवाई मार्गांवरील तिकिटांचे दर तब्बल 70 टक्क्यांपर्यंत वाढल्याचे समोर आले आहे.

विमान वाहतूक विश्लेषण कंपनी OAG च्या आकडेवारीनुसार, देशातील सर्वात मोठी कंपनी असलेल्या इंडिगोची ऑक्टोबर 2026 मधील आसन क्षमता 13.1 दशलक्ष इतकी असून त्यात गेल्या वर्षीच्या तुलनेत 0.2 टक्क्यांनी (28600 जागा) घट झाली आहे. यापूर्वी ऑगस्ट 2026 मध्ये इंडिगोकडे 11.7 दशलक्ष आणि सप्टेंबर 2026 मध्ये 11.3 दशलक्ष जागा उपलब्ध होत्या. दुसरीकडे, एअर इंडियाने कामकाजाची पुनर्रचना करताना ऑक्टोबर 2026 मध्ये उपलब्ध असलेल्या 33 लाख जागांमध्ये 12.6 टक्क्यांची (478000 जागा) मोठी कपात केली आहे. स्पाईस जेटने सर्वाधिक 38.8 टक्के म्हणजे 241000 आसने कमी केली आहेत, तर अकासा एअरने मात्र 35.6 टक्क्यांनी आपली आसन क्षमता वाढवली आहे.
इंधन अधिभार वाढ आणि आंतरराष्ट्रीय आव्हानांमुळे भाड्यावर दबाव
जेट इंधनाच्या (ATF) सातत्याने वाढणाऱ्या किमती, जागतिक पातळीवरील भू-राजकीय आव्हाने आणि अमेरिकन डॉलरच्या तुलनेत भारतीय रुपयाचे होणारे अवमूल्यन यामुळे विमान कंपन्या आपल्या उड्डाणांची पुनर्रचना करत आहेत. वाढत्या खर्चाचा भार भरून काढण्यासाठी ऑक्टोबरच्या सुरुवातीलाच इंडिगोने देशांतर्गत तसेच आंतरराष्ट्रीय मार्गांवरील इंधन अधिभारात (Fuel Surcharge) वाढ केली होती. या सर्वांचा एकत्रित परिणाम म्हणून सणांच्या काळात विमान तिकिटांची टंचाई निर्माण होऊन दर आकाशाला भिडले आहेत.
मुंबई-दिल्ली मार्गावर क्षमतेत वाढ
देशातील विविध हवाई मार्गांचा विचार केल्यास मुंबई ते दिल्ली हा सर्वात व्यस्त मार्ग ठरला असून, या मार्गावर 681800 जागा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत, ज्या गेल्या वर्षीच्या तुलनेत 7 टक्क्यांनी जास्त आहेत. दुसऱ्या क्रमांकावर असलेल्या बंगळूर ते दिल्ली मार्गावर 475100 जागा असून, त्यात 1 टक्क्याने घट नोंदवली गेली आहे. दुसरीकडे, कोलकाता ते दिल्ली मार्गावर सर्वात जलद गतीने 13 टक्क्यांची वाढ होऊन क्षमता 325000 जागांवर पोहोचली आहे. उड्डाणांमधील ही विषमता आणि एकूण आसन कपातीमुळे प्रवाशांना यंदा दिवाळीत प्रवास करण्यासाठी अधिक मोजावे लागत आहेत.