अमरावती,
amravati-nagpur-highway-accidentअमरावती - नागपूर महामार्गावर एक भीषण अपघात घडलाय. तिवसा तालुक्यातील वरखेड फाट्यानजीक दुचाकीचा भीषण अपघात झाल्याची घटना घडलीय. या अपघातात दुचाकीवरील दोघांचा जागीच मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडलीय. नागपूर - अमरावती महामार्गावर भरधाव ट्रॅव्हल्सची दुचाकीला जोरदार धडक दिल्याने हा अपघात झालाय. तर निखिल बोके आणि कैलास कळंबे या दोन तरुणांचा यात जागीच मृत्यू झाला आहे. मिळालेल्या माहितीनुसार दोघेही उंबरखेड येथील रहिवासी असून तिवस्याहून गावी जाताना ही अपघाताची घटना घडली आहे.
दरम्यान, घटनेची माहिती मिळताच तिवसा पोलिसांनी घटनास्थळ गाठत कारवाई सुरु केली. यात ट्रॅव्हल्स चालकाला ताब्यात घेतले असून पोलिसांकडून पुढील तपास सुरू. कैलास यांची पत्नी आठ महिन्यांची गर्भवती आहे. पुढील महिन्यात त्यांची प्रसूती होणार होती. मात्र बाळाच्या जन्माआधीच पित्याचे छत्र हरपले. या दुर्दैवी घटनेने परिसरात मोठी खळबळ उडाली असून उंबरखेड गावात हळहळ व्यक्त केली जात आहे.
दुसरीकडे भंडाऱ्याच्या तुमसरमध्ये अशीच एक दुदैवी घटना घडली आहे. सहकारी वर्ग मित्रांसोबत शाळेच्या छतावर कबड्डीचा सराव करताना तिथून गेलेल्या उच्च दाब विद्युत वाहिनीच्या जिवंत तारांना स्पर्श झाल्यानं विद्यार्थ्याला जबर धक्का बसला होता. ही घटना गुरुवारी भंडाऱ्याच्या तुमसर तालुक्यातील सिहोरा येथील आदर्श हायस्कूल इथं घडली होती. दरम्यान, गंभीर जखमी विद्यार्थ्यावर नागपूर इथं उपचार सुरू असताना काल सायंकाळी या विद्यार्थ्याचा मृत्यू झाला. अर्णव शेंद्रे असं या 14 वर्षीय मृत पावलेल्या विद्यार्थ्यांचं नावं आहे. शाळेच्या इमारतीवरून जिवंत विद्युत वाहिनीच्या तारा गेलेल्या असल्यानं ही दुर्घटना घडली. अर्णव याची उत्कृष्ट कबड्डीपटू आणि अभ्यासात अत्यंत हुशार मुलगा म्हणून ओळख होती. त्याच्या अकाली निधनानं सर्वत्र हळहळ व्यक्त होतं आहे.