नागपूर,
arnab-cyclone-nagpur-rain-alertबंगालच्या उपसागरात निर्माण झालेल्या 'अर्णव' चक्रीवादळामुळे गुरुवार, २९ ऑक्टोबर रोजी नागपूरसह पूर्व विदर्भातील अनेक जिल्ह्यांत जोरदार वाऱ्यासह पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे. बंगालच्या उपसागरातील बाष्पयुक्त वारे विदर्भाच्या दिशेने सरकल्यामुळे २८ ते ३१ ऑक्टोबर या कालावधीत ठिकठिकाणी हलक्या ते मध्यम पावसाची शक्यता आहे.
बुधवारी दिवसभर ढगाळ वातावरणामुळे कमाल तापमानात घट झाली. हवामान विभागाच्या नोंदीनुसार, शहराचे कमाल तापमान ३२.६ अंश सेल्सिअस होते. शहरातील किमान तापमान १७.४ अंश सेल्सिअस नोंदविण्यात आले. गत दोन दिवसांपासून बहुतांश जिल्ह्यांत ढगाळ वातावरण आहे. ढग असल्याने सर्व जिल्ह्यांच्या कमाल तापमानात घट नोंदविली गेली.
हवामान विभागाच्या माहितीनुसार, कमाल आणि किमान तापमानात घट होत असल्यामुळे पहाटे थंडी जाणवू लागली आहे. मात्र, कडाक्याच्या थंडीसाठी दिवाळीपर्यंत प्रतीक्षा करावी लागणार आहे. 'एल निनो'मुळे तापमान आणि पावसाचे नेहमीचे चक्र विस्कळीत झाले आहे. पुढील दोन दिवस विदर्भातील काही जिल्ह्यांत हलक्या ते मुसळधार पावसाची शक्यता असून या काळात वारे वेगाने वाहण्याचाही अंदाज वर्तविण्यात आला आहे. दरम्यानच्या काळात विदर्भातील बहुतांश भागांत ढगाळ वातावरण कायम राहण्याची शक्यता आहे. ऐन पिके काढणीच्या दिवसांत पावसाची शक्यता निर्माण झाल्याने शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे. मुख्यतः पावसासोबत काही ठिकाणी विजांच्या कडकडाटासह वादळी वारे वाहण्याची शक्यता असून शेतकऱ्यांनी खबरदारी घ्यावी, असे आवाहन हवामान विभागाने केले आहे.