नवी दिल्ली,
arnav-cyclone-updateअर्णव चक्रीवादळ अखेर धडकलं आहे. आज सकाळी आंध्रप्रदेश आणि यानमच्या समुद्र किनाऱ्यावर वादळाचं लँडफॉल झालं. यावेळी वाऱ्याचा वेग प्रति ताशी 125 ते 135 किलोमीटर इतका होता. हा वेग नंतर प्रचंड वाढून प्रति ताशी 150 किलोमीटर झाला. INSAT-3DS या भारताच्या सॅटेलाईटने या वादळाचे फोटो टिपले आहेत. त्यात वादळाचे काळेकुट्ट ढग दिसत आहेत. पूर्व आणि दक्षिण भारतासह बंगालच्या खाडीपर्यंत हे काळेकुट्ट ढग पसरलेले दिसत आहेत. म्हणजे अर्ध्या भारतावर अर्णव चक्रीवादळाचं संकट घोंघावत आहे. त्यामुळे हाहा:कार उडण्याची शक्यता वर्तवली जात आहे. हवामान खात्याच्या मते, किनारपट्टी पार केल्यानंतर हे वादळ जमिनीच्या दिशेने सरकत आहे. त्याचा धोका लगेच संपणार नाही. अनेक ठिकाणी अतिवृष्टी आणि पाणी साचण्याचे प्रकार होण्याची शक्यता आहे.

बुधवारी सकाळी 9:30 ते 9:57 वाजेच्या दरम्यान सॅटेलाइटने हे फोटो टिपले आहेत. या फोटोत काळेकुट्ट ढग दूरपर्यंत पसरलेले दिसत आहेत. काळ्या ढगांच्या पट्ट्या यात दिसत आहेत. यावरून हे चक्रीवादळ केवळ त्याच्या केंद्रापर्यंतच मर्यादित नाहीये, तर मोठ्या भागापर्यंत हे काळे ढग पसरले असून त्यामुळे चक्रीवादळाचा धोका वाढला आहे. एखाद्या भागात काळेकुट्ट ढग दिसले म्हणजे चक्रीवादळ येईल, असा त्याचा अर्थ नसल्याचंही हवामान खात्याने म्हटलं आहे.
हवामान खात्याने दिलेल्या ताज्या माहितीनुसार, अर्णव चक्रीवादळाने 28 ऑक्टोबरच्या रात्री 2 वाजल्यापासून सकाळी 8 वाजेच्या दरम्यान आंध्र प्रदेश आणि यानमची किनारपट्टी पार केली. या वादळाचं केंद्र नरसापूरच्या जवळ 20 किलोमीटर पूर्व, उत्तर-पूर्व, यानमपासून 40 किलोमीटर दक्षिण-पश्चिम आणि काकीनाडापासून 60 किलोमीटर दक्षिण-पश्चिम किनाऱ्यावर होतं. किनारपट्टीला वादळ धडकण्यापूर्वी त्याचा वेग प्रति ताशी 125 ते 135 किलोमीटर होता. नंतर हा वेग प्रति ताशी 150 किलोमीटर झाला. किनारपट्टी पार केल्यानंतर वादळाचं केंद्र जमिनीच्या आत गेलं.
समुद्राच्यावर गरम पाण्यामुळे वादळाला बळ मिळतं. जेव्हा वादळ जमिनीला धडकतं, त्यावेळी त्याला समुद्राकडून मिळणारी उष्णता आणि दमटपणा कमी होतो. जमिनीवर हवेला मोठ्या प्रमाणावर अडथळा येतो. त्यामुळे वादळ हळूहळू कमकुवत होतं. पण याचा अर्थ धोका टळला असं होत नाही.