वर्धा,
wardha पंतप्रधान नरेंद्र मोदी देशातच नव्हे तर जगात लोकप्रिय नेते ठरले आहेत. त्यांच्या कार्याचा वेग व भविष्याप्रती असलेली दृष्टी बघता विरोधी पक्षांना नरेंद्र मोदी यांची लोकप्रियता सहन होत नाही. याच आकसापोटी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खडगे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दिवंगत वडिलांबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य केले. या वक्तव्याचा निषेध म्हणून भारतीय जनता पार्टीच्या वतीने स्थानिक शिवाजी महाराज चौकात आंदोलन केले. यावेळी खडगे यांचा जाहीर निषेध करण्यात आला. खडगे यांनी पंतप्रधान नरेेंद्र मोदी यांच्यासह देशाची माफी मागावी, अशी मागणी भाजपाने केली.
यावेळी जिल्हाध्यक्ष संजय गाते म्हणाले, काँग्रेसने वैचारिक विरोध करावा, परंतु खालच्या स्तरावरचे राजकारण करू नये. मल्लिकार्जुन खडगे यांनी केलेल्या वक्तव्याबद्दल जाहीर माफी मागावी, अशी मागणी करीत मल्लिकार्जुन खडगे यांचा जाहीर निषेध केला. काँग्रेसचा प्रत्येक ठिकाणी पराभव होत असल्याने त्यांना पंतप्रधान मोदी यांचा वाढता आलेख पाहावला जात नाही.
एकीकडे काँग्रेस नेते राहुल गांधी आंदोलनाच्या नावाखाली संपूर्ण देशाला वेठीस धरत देशात असुरक्षितता निर्माण करीत आहेत. प्रियांका गांधी यांनाही देशाने नेता म्हणून स्वीकारलेले नाही. एका घराण्यापर्यंत मर्यादित असलेला पक्ष आता अपयशी ठरत असल्याने खडगेसारखे नेतेही मोदींनाच नव्हे तर त्यांच्या दिवंगत वडिलांविषयी बोलू लागले आहेत. यापूर्वी या पक्षाने पंतप्रधान मोदी यांच्या आईविषयीही गरळ ओकली होती. मोदींविरोधी बोलणे हा काँग्रेसचा छंद झाला असल्याची टीकाही गाते यांनी केली. याप्रसंगी जिल्हा मुख्यालय प्रभारी श्रीधर देशमुख, शहर अध्यक्ष नीलेश किटे, जयंत कावळे, प्रशांत बुर्ले, अर्चना वानखेडे, विरू पांडे, गटनेता विलास आगे, सतीश मिसाळ, प्रदीप तलमले, श्रेया देशमुख, कमल गिरी, अपर्णा उंबरकर, कुणाल खंगार, डब्बू शर्मा, राहुल करंडे, कमलेश आकरे, दिनेश डकरे, कन्हैयालाल चैनानी आदींसह भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते उपस्थित होते.