मनावर नियंत्रण ठेवल्यास मोठे परिवर्तन घडवू शकते: डॉ. स्वाती सारडा

    दिनांक :28-Oct-2026
Total Views |
कारंजा लाड,
dr-swati-sarda मन हे चंचल आहे ते लवकर एकाग्र होत नाही. अनेक इच्छा आणि तिच्या आकांक्षा मनात निर्माण होतात. आपल्या मनासारखं काही घडलं नाही तर ताणतणाव, राग, चिंता निर्माण होतात. अशा वेळी मनावर नियंत्रण ठेवल्यास मोठे परिवर्तन घडू शकते असे मत नागपूर येथील डॉ. स्वाती सरडा यांनी व्यक्त केले. त्या कारंजा येथील कै. नानासाहेब दहीहांडेकर प्रांगणात सुरू असलेल्या व्याख्यानमालेत २७ ऑटोबरला मनाचे व्यवस्थापन या विषयावर बोलत होत्या.
 
 
dr-swati-sarda
 
प्रारंभी डॉ. दीपिका काटोले व पियुषा भोयर यांनी वत्यांचे स्वागत केले. तर प्रमुख अतिथी डॉ. दिनेश सारडा यांचे स्वागत डॉ. शार्दुल डोणगावकर यांनी केले. डॉ. कविता मिसाळ यांनी वत्ंयाच्या परिचय करून दिला. मनात निर्माण होणारे अनेक विचार व भावना यांचे व्यवस्थापन करताना कोणती काळजी घ्यावी याविषयी सारडा म्हणाल्या की, मनात येणार्‍या विचारांना रोखू नका त्यांना येऊ द्या. जे विचार हितकारी आहेत त्यांना स्वीकारा. झटपट निर्णय घेतल्यापेक्षा चिंतन करून निर्णय घेणे हिताचे ठरते. जगताना ताण तणाव , क्रोध येणे स्वाभाविक आहे, मात्र त्यावर संयमाने नियंत्रण ठेवल्यास पुढे पश्चातापाची पाळी येणार नाही. ताणतणाव, क्रोध व चिंता या बाबी अनेक रोगांना आमंत्रण देत असतात असे त्या म्हणाल्या. दैनिक जीवनात माणसांमध्ये वाद निर्माण होतात अशावेळी कोणी रागात अपशब्द बोलत असेल तर ते मनावर घेऊ नका, उलट रागावलेल्या माणसाविषयी संवेदना बाळगा असे केल्यास अनेक समस्या दूर होतील.
 
 
चिंता कशी कमी करावी याविषयी डॉ. सारडा म्हणाल्या की, मनात निर्माण झालेली चिंता, वाईट विचार, नकारात्मकता यांना दूर सारण्यासाठी नेहमी सकारात्मक वृत्ती ठेवा. प्रत्येक पाऊलावर परिवर्तनाची आस धरा. मी जे करेल ते चांगले करेल. असा मनात विश्वास निर्माण करा. आपल्या जगण्यातील नकारात्मक दूर केल्यास जगण्यातील आनंद व शांती निर्माण झाल्याशिवाय राहणार नाही, असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला. कार्यक्रमाचे संचलन व आभार डॉ. रुची फाफट यांनी केले तर शारदा स्तवन डॉ. सुशील देशपांडे यांनी म्हटले. व्याख्यानासाठी श्रोते मोठ्या संख्येने उपस्थित होते.