मुंबई
Cyclone Arnab चक्रीवादळ ‘अर्नब’मुळे देशातील अनेक राज्यांमध्ये हवामानाने रौद्र रूप धारण केले असून, ओडिशा, आंध्र प्रदेश आणि छत्तीसगडमध्ये जोरदार वाऱ्यांसह मुसळधार पाऊस सुरू आहे. भारतीय हवामान विभागाने आंध्र प्रदेश, यानम, ओडिशा आणि छत्तीसगडसाठी अतिवृष्टीचा रेड अलर्ट जारी केला आहे. झारखंड, तेलंगणा आणि मध्य प्रदेशातही मुसळधार पावसाचा धोका लक्षात घेता ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. या चक्रीवादळाचा प्रभाव पुढील काही दिवस देशाच्या विविध भागांत जाणवण्याची शक्यता असून, २८ ऑक्टोबर रोजी केरळ आणि माहे येथेही पाऊस पडण्याचा अंदाज वर्तविण्यात आला आहे.
चक्रीवादळाच्या प्रभावामुळे काही राज्यांमध्ये वाऱ्यांचा वेग ताशी १०० किलोमीटरच्या पुढे जाण्याची शक्यता आहे. २८ ऑक्टोबर रोजी आंध्र प्रदेश आणि छत्तीसगडमध्ये ताशी १०० किलोमीटरपेक्षा अधिक वेगाने वारे वाहू शकतात. तेलंगणामध्ये वाऱ्यांचा वेग ताशी ६० ते ७० किलोमीटर राहण्याचा अंदाज आहे. झारखंड आणि आसपासच्या राज्यांमध्येही ताशी ५० ते ६० किलोमीटर वेगाने वारे वाहण्याची शक्यता आहे. छत्तीसगडमध्ये वादळी वाऱ्यांसह मेघगर्जना होण्याचा इशारा देण्यात आला आहे. येथे वाऱ्यांचा वेग ताशी ६० ते ७० किलोमीटरपर्यंत पोहोचू शकतो, तर काही ठिकाणी तो ताशी ८० किलोमीटरपर्यंत जाण्याची शक्यता हवामान विभागाने व्यक्त केली आहे.
२८ ते ३१ ऑक्टोबर या कालावधीत अंदमान आणि निकोबार बेटे, उप-हिमालयीन पश्चिम बंगाल, सिक्कीम, गंगेच्या खोऱ्यातील पश्चिम बंगाल आणि झारखंडमध्ये जोरदार पाऊस पडण्याची शक्यता आहे. बिहारमध्ये २९ ते ३१ ऑक्टोबरदरम्यान अनेक भागांत पावसाचा जोर वाढू शकतो. या काळात वाऱ्यांचा वेग ताशी ३० ते ४० किलोमीटर राहण्याचा अंदाज आहे. पश्चिम मध्य प्रदेश, पूर्व मध्य प्रदेश आणि छत्तीसगडमध्ये २८ ऑक्टोबर ते २ नोव्हेंबर या काळात पावसाची शक्यता असून, ३० ऑक्टोबर रोजी विदर्भातही पाऊस पडू शकतो.
उत्तर भारतातील काही Cyclone Arnab राज्यांनाही या हवामान बदलाचा फटका बसण्याची शक्यता आहे. जम्मू-काश्मीर, लडाख, गिलगिट-बाल्टिस्तान आणि मुझफ्फराबाद येथे २८ ते ३० ऑक्टोबरदरम्यान काही ठिकाणी पाऊस पडू शकतो. हिमाचल प्रदेशात २९ ऑक्टोबर ते २ नोव्हेंबर, तर उत्तराखंडमध्ये २८ ऑक्टोबर ते २ नोव्हेंबर या कालावधीत तुरळक ठिकाणी पावसाचा अंदाज आहे. पंजाबमध्ये २९ ऑक्टोबर ते १ नोव्हेंबर आणि हरियाणा, चंदीगड व दिल्लीमध्ये २८ ऑक्टोबर ते १ नोव्हेंबरदरम्यान हलक्या पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे. पूर्व उत्तर प्रदेश आणि पश्चिम राजस्थानमध्ये २९ व ३० ऑक्टोबर रोजी काही भागांत पाऊस होऊ शकतो. याशिवाय, २९ आणि ३० ऑक्टोबरदरम्यान हरियाणा, चंदीगड, दिल्ली आणि पंजाबमधील काही ठिकाणी गारपीट होण्याचीही शक्यता आहे.
दरम्यान, आंध्र प्रदेश आणि ओडिशामध्ये चक्रीवादळाचा प्रभाव अधिक तीव्रतेने जाणवत आहे. आंध्र प्रदेशातील अनेक जिल्ह्यांमध्ये बुधवारी सकाळपासूनच वादळी वाऱ्यांसह मुसळधार पाऊस कोसळत आहे. या वादळामुळे अनेक ठिकाणी झाडे उन्मळून पडली असून, वीजवाहिन्यांचेही नुकसान झाले आहे. काकीनाडा येथील किनारपट्टी भागातील नागरिकांना चक्रीवादळामुळे झालेल्या नुकसानीचा सामना करावा लागत आहे. समुद्राचे पाणी वस्त्यांमध्ये शिरल्याने अनेक घरांमध्ये पाणी घुसले आहे. त्यामुळे स्थानिक रहिवाशांसमोर मोठ्या अडचणी निर्माण झाल्या आहेत.
चक्रीवादळाचा परिणाम केवळ किनारपट्टीपुरता मर्यादित न राहता मध्य, पूर्व आणि उत्तर भारतातील अनेक राज्यांमध्येही पाऊस, वादळी वारे आणि गारपिटीच्या स्वरूपात जाणवण्याची शक्यता आहे. पुढील काही दिवसांसाठी हवामान विभागाने विविध राज्यांमध्ये सतर्कतेचा इशारा दिला असून, ‘अर्नब’च्या प्रभावामुळे देशातील अनेक भागांतील हवामानात मोठे बदल होण्याचा अंदाज आहे.