सुदानमध्ये 100 हून अधिक नागरिकांचा जागीच मृत्यू

भरबाजारात ड्रोन हल्ला करत पाडला मृतांचा खच

    दिनांक :28-Oct-2026
Total Views |
सुदान,
Drone strike in sudanमागील काही दिवसांपासून सुदानमध्ये भीषण गृहयुद्ध सुरू आहे. आता या गृहयुद्धाने रक्तरंजित वळण घेतलं आहे. दक्षिण-पश्चिमी सुदानमधील दक्षिण दारफुर प्रांताची राजधानी असलेल्या न्याला मोठा हल्ला करण्यात आला आहे. येथे सोमवारी सायंकाळी गजबजलेल्या बाजारावर ड्रोन हल्ला करण्यात आला आहे. या हल्ल्यात १०० हून अधिक निष्पाप नागरिकांचा बळी गेला असून, ११३ हून अधिक लोक गंभीर जखमी झाले आहेत. मृतांमध्ये आणि जखमींमध्ये महिला व लहान बालकांची संख्या मोठ्या प्रमाणावर असल्याने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.
 

sudanv 
 
मानवाधिकार संघटनेकडून हल्ल्याचा निषेध
या मानवी संहाराची गंभीर दखल घेत मानवाधिकार संघटना 'इमरजेंसी लॉयर्स'ने एका निवेदनाद्वारे या भयंकर हल्ल्यासाठी थेट सुदानी सैन्याला जबाबदार धरलं आहे. अत्यंत वर्दळीच्या असलेल्या या बाजाराला या हल्ल्याने अवघ्या काही क्षणांत सामूहिक हत्याकांडाच्या विदारक दृश्यात बदलून टाकल. आधीच युद्धाच्या झळा सोसत असलेल्या सामान्य नागरिकांच्या जगण्याचा संघर्ष या हल्ल्याने आणखी बिकट केला असल्याचे सांगत संघटनेने या प्रकरणाची तातडीने स्वतंत्र चौकशी करण्याची जोरदार मागणी केली आहे.
 
आंतरराष्ट्रीय वैद्यकीय मदत संस्था ‘डॉक्टर्स विदाउट बॉर्डर्स’ ने दिलेल्या माहितीनुसार, न्याला येथील त्यांच्या रुग्णालयात ३६ मृतदेह आणण्यात आले होते, तर आपत्कालीन विभागात तब्बल १५० जखमींवर उपचार सुरू आहेत. सध्या दक्षिण दारफुरची राजधानी न्याला शहर अर्धसैनिक दल असलेल्या ‘रॅपिड सपोर्ट फोर्सेज’ च्या नियंत्रणाखाली आहे. हे दल एप्रिल २०२३ पासून सुदानी लष्कराशी सशस्त्र संघर्ष करत आहे.