firecrackers दिवाळी, हा प्रकाशाचा सण अवघ्या आठ दिवसांवर आला आहे. मागील काही वर्षात या प्राचीन, पारंपरिक उत्सवाचे स्वरूप बर्याच प्रमाणात बदलले आहे. पारंपरिक दिव्यांचा वापर कमी होऊन मोठ्या प्रमाणावर इलेक्ट्रिक वा मेण्यांच्या दिव्यांचा वापर वाढला आहे. आनंदऐवजी वातावरणात धूर, प्रदूषण व आजारांचे प्रमाण वाढले आहे. पर्यावरणच नव्हे तर आरोग्यासाठी, विशेषतः लहान मुले, वृद्धांना फटाक्यांमधून बाहेर पडणारा धूर व तीव्र आवाज अत्यंत घातक ठरतो आहे.

फटाक्यांच्या आवाजाची तीव्रता १००-१४० डेसिबलपर्यंत असते. जागतिक आरोग्य संघटनेनुसार ८५ डेसिबलपेक्षा मोठा आवाज श्रवणशक्तीसाठी हानिकारक असतो. कानात वेदना, ऐकण्यात अडचण, डोकेदुखी, झोप येणे, चिडचिड, पाळीव प्राण्यांमध्ये मानसिक तणाव निर्माण होतो. लहान मुलांमध्ये दमा, अस्थमा व अॅलर्जीचे प्रमाण वाढते. डोळ्यांत जळजळ, त्वचेवर पुरळ, घशात खवखव, मनःस्वास्थ्यावर परिणाम, एकाग्रता कमी होते.
वृद्धांना हृदयाचा तीव्र विकार, श्वसनास त्रास, उच्च रक्तदाब तसेच अस्वस्थता वाढते. केवळ वृद्ध, मुले वा गर्भवतींच नव्हे तर कुणालाही फटाक्यांपासून शारीरिक इजा- डोळ्यांत इजा, हाता-पायांना दुखापत, घरे, झाडे वा दुकानांना आग लागणेे हे धोके आहेत. फटाक्यांमधील रसायनांमुळे जमिनीतील पाणी व माती प्रदूषित होतेे.
उपाययोजना व पर्यायी मार्ग
-कमी ध्वनी व कमी धूर निर्माण करणारे ग्रीन फटाके एका ठिकाणी, सामूहिक नियंत्रित फटाके फोडा मर्यादित प्रमाणात
-पर्यावरणास अनुकूल सजावटीसाठी पारंपरिक दिवे, रांगोळी-रात्री १० नंतर फटाके नकोच
दिवाळी म्हणजे केवळ फटाक्यांचा उत्सव नाही, अंधारावर प्रकाशाचा विजय आहे. फटाक्यांमुळे आनंदापेक्षा त्रास अधिक होतो. म्हणूनच आपला दृष्टिकोन बदलण्याची गरज आहे. या वर्षी दिवे लावू, पण धूर नाही. आनंद साजरा करू, पण आरोग्य बिघडवणार नाही! हा एक नवा संकल्प करू....
-डॉ. उदय बोधनकरकार्यकारी संचालक (कोम्हाड)