शेतशिवारात माजी प्राध्यापकाची हत्या

विटांनी मारहाण करून संपवले

    दिनांक :28-Oct-2026
Total Views |
आमगाव
chandrashekhar dahikar आमगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीतील बोथली गावाजवळ एका माजी प्राध्यापकाची हत्या झाल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. चंद्रशेखर दहीकर असे मृत व्यक्तीचे नाव असून, अज्ञात हल्लेखोरांनी विटांनी मारहाण करून त्यांचा जीव घेतल्याची प्राथमिक माहिती आहे. त्यांच्या शेतातील निवासस्थानासमोर वनविभागाच्या जमिनीवर रक्ताच्या थारोळ्यात मृतदेह आढळून आला. या घटनेमुळे बोथली गावासह परिसरात खळबळ उडाली असून, आमगाव पोलीस हल्लेखोरांचा शोध घेत आहेत.
 

former professor chandrashekhar dahikar murdered in amgaon, gondia; police investigation underway 
चंद्रशेखर दहीकर हे ठाणाटोला-जवरी मार्गावरील बोथली गावाच्या शेतशिवारात वास्तव्यास होते. ते शेतात एकटेच राहत होते. उदरनिर्वाहासाठी त्यांनी याच ठिकाणी कुक्कुटपालनाचा व्यवसायही सुरू केला होता. रात्रीच्या सुमारास अज्ञात व्यक्तींनी त्यांच्यावर विटांनी हल्ला केला. या मारहाणीत त्यांचा मृत्यू झाल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात येत आहे.
सकाळी शेजारील शेतात जाणाऱ्या एका शेतकऱ्याला दहीकर यांचा मृतदेह त्यांच्या निवासस्थानासमोरील वनविभागाच्या जमिनीवर रक्ताच्या थारोळ्यात पडलेला दिसला. हा प्रकार लक्षात येताच संबंधित शेतकऱ्याने बोथली ग्रामपंचायतीच्या सरपंचांना माहिती दिली. सरपंचांनी तातडीने पोलिसांना घटनेची कल्पना दिल्यानंतर पोलीस घटनास्थळी दाखल झाले.
घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन chandrashekhar dahikar आमगाव पोलिसांनी तपास सुरू केला आहे. दहीकर यांची हत्या कोणत्या कारणातून करण्यात आली, हल्ल्यामागे नेमका कोणाचा सहभाग आहे आणि आरोपी कोण आहेत, याचा शोध घेतला जात आहे. निर्जन शेतशिवारात घडलेल्या या हत्येचा उलगडा करून आरोपींना शोधण्याचे आव्हान पोलिसांसमोर आहे.
या घटनेमुळे बोथली गाव आणि परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. हत्येमागील कारण तसेच आरोपींबाबतची सविस्तर माहिती पोलीस तपास पूर्ण झाल्यानंतरच स्पष्ट होणार आहे.