जमिनीच्या व्यवहारातील मध्यस्थीनेच केला गेम!

चार लाखांसाठी जमीन मालकाचा खून

    दिनांक :28-Oct-2026
Total Views |
१२ तासांतच गुन्ह्याचा उलगडा
गोंदिया,

Gondia Murder Case जमीनीच्या व्यवहारातील ५ लाख रुपयांपैकी ४ लाख रुपये मध्यस्थीकडून खर्च झाल्याने पैसे परत कसे करणार या विवंचनेतून मध्यस्थीनेच जमीन मालकाची हत्या केल्याची धक्कादायक घटना आमगाव तालुक्यातील बोथली येथे २७ ऑक्टोबर रोजी सकाळी ११.३० वाजताच्या सुमारास उघडकीस आली. या प्रकरणी स्थानिक गुन्हे शाखा पथकाने अवघ्या १२ तासातच गुन्ह्याचा उलगडा केला असून आरोपीला ताब्यात घेण्यात आले आहे. चंद्रशेखर भास्कर दहीकर (६१) रा. बोथली असे मृताचे नाव असून, अजय शामराव ब्राह्मणकर (२१) असे आरोपीचे नाव आहे.
 

Gondia Murder Case Land Deal Dispute Leads to Owner’s Killing, Accused Held Within 12 Hours 
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, २७ ऑक्टोबर रोजी सकाळी साडेअकरा वाजताच्या सुमारास बोथली शेतशिवारात एका अज्ञात व्यक्तीचा खून झाल्याची माहिती पोलिसांना मिळाली. गुन्ह्याचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलिस अधीक्षक गोरख भामरे यांच्या निर्देशानुसार स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक रेवचंद सिंगनजुडे यांच्या मार्गदर्शनात स्थानिक गुन्हे पथकाने तपास सुरू केला. तपासात चंद्रशेखर दहीकर हे बोथली येथे एकटे राहत असून गेल्या सप्टेंबर महिण्यात त्यांनी आमगाव येथील आपली जमीन आरोपी अजय ब्राह्मणकर याच्या मध्यस्थीने विक्री केल्याचे समजले. या आधारे पथकाने आरोपी अजय ब्राम्हणकर यास ताब्यात घेऊन चौकशी केली असता त्याने खूनाची कबूली दिली. आरोपी अजयने पोलिसांना दिलेल्या माहितीनुसार जमीन विक्री व्यवहारात खरेदीदाराकडून दहीकर यांना टोकन म्हणून ५ लाख रुपये मिळाले होते. यांपैकी ४ लाख रुपये त्यांनी अजयच्या बँक खात्यात ठेवले होते.
मात्र, जमिनीची कागदपत्रे योग्य नसल्याने व्यवहार रद्द झाला. त्यामुळे खरेदीदाराला २७ ऑक्टोबरपर्यंत टोकनची रक्कम परत करायची होती. यावर दहीकर यांनी अजयला चार लाख रुपये परत मागितले, मात्र त्यापैकी साडेतीन लाख रुपये त्याने शेअर बाजारातील इंट्राडे ट्रेडिंगमध्ये खर्च केल्याने पैसे परत करण्यास तो असमर्थ होता. परिणामी त्याने दहीकर यांचा खून करण्याचा बेत आखला. दरम्यान, २६ ऑक्टोबर रोजी रात्री १० वाजताच्या सुमारास दहीकर हे गावाकडून घरी परत येत असता आरोपी अजयने त्यांच्या डोक्यावर व छातीवर विटेने वार करून त्यांचा खून केला. त्यानंतर मृतदेह घरासमोरील झुडपात लपवून ठेवल्याची कबुली दिली. याप्रकरणी जवरी येथील पोलिस पाटील शकुंतला चंद्रकुमार पाथोडे यांच्या तक्रारीवरून आमगाव पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील कायदेशीर कारवाईसाठी आरोपीला आमगाव पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे.