जळगाव,
Shiv Sena Leader Yogesh Wagh जळगाव शहरातील पिंप्राळा परिसरात घरात इलेक्ट्रिक फिटिंगचे काम करत असताना विजेचा तीव्र धक्का लागून खासगी वायरमन योगेश उर्फ भैय्या वाघ यांचा मृत्यू झाला. योगेश वाघ हे शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) गटाचे पिंप्राळा विभागप्रमुख होते. त्यांच्या निधनाची बातमी समजताच कुटुंबीय, नातेवाईक आणि शिवसैनिकांनी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात गर्दी केली. या घटनेमुळे परिसरात शोककळा पसरली आहे.
योगेश वाघ हे नेहमीप्रमाणे सकाळी कामासाठी घराबाहेर पडले होते. घरामध्ये इलेक्ट्रिक फिटिंगचे काम सुरू असताना त्यांना विजेचा जोरदार धक्का बसला. त्यानंतर त्यांना तातडीने जळगाव येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात दाखल करण्यात आले; मात्र तपासणीनंतर डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. सकाळी कामावर गेलेल्या योगेश यांच्या मृत्यूची बातमी दुपारी कळताच कुटुंबीयांसह स्थानिक शिवसेना कार्यकर्त्यांना मोठा धक्का बसला. शिवसेना ठाकरे गटाचे माजी महानगराध्यक्ष गजानन मालपुरे यांनीही या घटनेबद्दल दुःख व्यक्त केले.
दुसरी दुर्दैवी घटना
विशेष म्हणजे, वीजेच्या धक्क्याने मृत्यू होण्याची जळगाव जिल्ह्यातील ही सलग दुसरी दुर्दैवी घटना आहे. कालच भुसावळ येथे एका शेतकरी दाम्पत्याचा विजेच्या धक्क्याने मृत्यू झाला होता. घरात मुलीच्या साखरपुड्याची तयारी सुरू असतानाच आई-वडिलांचा मृत्यू झाल्याने या कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला. त्यानंतर आज शिवसेना विभागप्रमुख योगेश वाघ यांचाही विजेच्या धक्क्याने मृत्यू झाल्याने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.
दरम्यान, जळगाव शहरालगतच्या पाळधी-तरसोद बायपासवर अपघातांची मालिका कायम असून, आणखी एका तरुणाला जीव गमवावा लागला आहे. पाळधी रेल्वे पुलावर आयशर मालवाहू वाहनाने दुचाकीला जोरदार धडक दिल्याने योगेश गजमल राक्षे यांचा मृत्यू झाला. बायपासवरील अपघातांमध्ये मृत्यू झालेल्यांची संख्या आता १३ वर पोहोचली आहे.योगेश राक्षे हे आव्हाणे येथील खताच्या गोदामात मजुरीचे काम करत होते. दुचाकीवरून घरी जात असताना पाळधी रेल्वे पुलावर समोरून येणाऱ्या आयशर वाहनाने त्यांच्या दुचाकीला धडक दिली. या अपघातात गंभीर जखमी झालेल्या योगेश यांना जळगावच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, उपचारापूर्वीच डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. विशेष म्हणजे, योगेश यांचे अवघ्या तीन महिन्यांपूर्वी लग्न झाले होते. त्यांच्या अकाली मृत्यूमुळे राक्षे कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.
पाळधी-तरसोद बायपासवरील अपघातांचे प्रमाण वाढत असल्याने या मार्गावरील वाहतुकीचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. ३० जुलै रोजी आसोदा पुलाचा भराव खचल्याने या मार्गावरील वाहतूक बंद करण्यात आली होती. परिणामी, अवजड वाहतूक शहरातून वळवण्यात आली. जुलैपासून आतापर्यंत बायपास परिसरात झालेल्या २५ अपघातांमध्ये १३ जणांचा मृत्यू झाला आहे. या प्रकरणी पोलिसांनी आयशर वाहनचालक धर्मेंद्र प्रवीण सिंग गोयल याला ताब्यात घेतले आहे.