श्योपुरमध्ये १९ महिन्यांच्या चित्त्याचा मृत्यू

शरीरातून बंदुकीच्या पाच गोळ्यांचे छर्रे बाहेर

    दिनांक :28-Oct-2026
Total Views |
भोपाळ
madhya pradesh मध्य प्रदेशातील श्योपूर येथे जखमी अवस्थेत आढळलेल्या १९ महिन्यांच्या नर चित्त्याला वाचवण्यासाठी वन विभागाने शर्थीचे प्रयत्न केले; मात्र उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. उपचारांसाठी करण्यात आलेल्या आपत्कालीन शस्त्रक्रियेत चित्त्याच्या शरीरातून बंदुकीचे पाच छर्रे काढण्यात आले. या घटनेमुळे चित्त्याला झालेल्या दुखापतींचे स्वरूप आणि त्यामागील कारणांबाबत गंभीर प्रश्न उपस्थित झाले आहेत. प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन राज्य सरकारने वन विभाग आणि पोलीस अधिकाऱ्यांचा समावेश असलेले विशेष तपास पथक (एसटीएफ) स्थापन केले आहे.
 


madhya pradesh 19-month-old cheetah dies after 5 gun pellets found in body, stf formed 
वन विभागाने प्रसिद्धिपत्रकाद्वारे दिलेल्या माहितीनुसार, KNG22 असे नाव असलेला हा १९ महिन्यांचा नर चित्ता २५ ऑक्टोबर २०२६ रोजी श्योपूर प्रादेशिक वन विभागाच्या अखत्यारीतील कंपार्टमेंट क्रमांक ७४८ मध्ये जखमी अवस्थेत आढळला होता. त्याला वाचवण्यासाठी तातडीने प्रयत्न सुरू करण्यात आले. मात्र, उपचार सुरू असतानाच मंगळवारी पहाटे त्याची प्राणज्योत मालवली.
चित्त्याच्या प्राथमिक क्ष-किरण तपासणीत त्याच्या शरीराच्या विविध भागांत बाह्य वस्तू असल्याचे आढळले. त्यानंतर पुढील उपचारांसाठी त्याला जबलपूर येथील नानाजी देशमुख पशुवैद्यकीय विज्ञान विद्यापीठाच्या (NDVSU) पशुवैद्यकीय शस्त्रक्रिया आणि रेडिओलॉजी विभागात हलवण्यात आले. तेथे करण्यात आलेल्या सीटी स्कॅनमधून चित्त्याच्या शरीरात अनेक बाह्य वस्तू असल्याचे स्पष्ट झाले. या वस्तूंमुळे त्याच्या अंतर्गत अवयवांसह स्नायू आणि हाडांच्या रचनेला तसेच मज्जासंस्थेला इजा झाल्याचे तपासणीतून समोर आले.
चित्त्याची प्रकृती गंभीर असल्याने त्याच्यावर तातडीने शस्त्रक्रिया करण्यात आली. या शस्त्रक्रियेदरम्यान त्याच्या शरीरातून बंदुकीचे पाच छर्रे काढण्यात आले. मात्र, गंभीर दुखापती आणि उपचारांसाठी केलेल्या प्रयत्नांनंतरही त्याचा जीव वाचू शकला नाही. चित्त्याच्या शरीरात छर्रे कसे आले, त्याच्यावर गोळीबार कोणी केला आणि या घटनेमागे नेमके काय कारण आहे, या प्रश्नांची उत्तरे तपासातून मिळण्याची अपेक्षा आहे.
चित्त्याच्या मृत्यूमुळे वन्यजीवांच्या सुरक्षेचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर आला आहे. या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने वन विभाग आणि पोलीस अधिकाऱ्यांचा समावेश करून विशेष तपास पथकाची स्थापना केली आहे. या पथकाकडून घटनेची चौकशी करण्यात येणार असून, चित्त्याला झालेल्या जखमांचे कारण आणि त्यामागील संभाव्य व्यक्ती किंवा घटकांचा शोध घेतला जाणार आहे.
दरम्यान, या मृत्यूमुळे madhya pradesh भारतातील चित्त्यांची एकूण संख्या ५८ वर आली आहे. त्यापैकी ५२ चित्ते मध्य प्रदेशातील कुनो राष्ट्रीय उद्यानात, चार चित्ते गांधीसागर वन्यजीव अभयारण्यात, तर दोन चित्ते वीरांगना दुर्गावती व्याघ्र प्रकल्पात आहेत.
 
 
या घटनेच्या काही दिवस madhya pradesh आधी श्योपूरमधील बामोरी गावाच्या परिसरात चित्त्यांनी दोन वासरांची शिकार केल्याची घटना घडली होती. रविवारी सकाळी पाचच्या सुमारास गावाबाहेरील एका घराच्या अंगणात बांधलेल्या दोन वासरांवर दोन चित्त्यांनी हल्ला करून त्यांची शिकार केली होती. या घटनेनंतर मादी चित्ता निर्वाच्या १९ महिन्यांच्या शावकाच्या जखमी होण्याची बातमी समोर आली. गंभीर जखमी अवस्थेत असलेल्या या शावकाला वन विभागाच्या पथकाने पुढील उपचारांसाठी जबलपूर येथे नेले होते. या दोन्ही घटनांमध्ये नेमका काय संबंध आहे, याबाबत अधिकृत निष्कर्ष अद्याप समोर आलेला नाही.
चित्त्याच्या मृत्यूनंतर वन विभागावर टीकेची झोड उठली आहे. माहिती अधिकार कार्यकर्ते अजय दुबे यांनी राज्य सरकारवर गंभीर आरोप केले आहेत. त्यांच्या म्हणण्यानुसार, या परिसरात बऱ्याच काळापासून बिबट्यांची शिकार करणारी टोळी सक्रिय होती; मात्र सरकारने तिच्याविरोधात आवश्यक कारवाई केली नाही. या आरोपांबाबत स्वतंत्र पडताळणी होणे आवश्यक असून, एसटीएफच्या तपासातून या दाव्यांची सत्यता स्पष्ट होऊ शकते.
दरम्यान, यापूर्वी कुनो राष्ट्रीय उद्यानातील एक चित्ता राजस्थानमधील बारण जिल्ह्यातील रामगढ क्रेटर परिसरात पोहोचला होता. तेथे त्याने एका शेळीची शिकार केल्याचा व्हिडिओही समोर आला होता. वन्यजीवांच्या अधिवासाबाहेरील हालचाली आणि त्यांच्या सुरक्षिततेबाबत यापूर्वीही चर्चा झाली होती. आता श्योपूरमध्ये १९ महिन्यांच्या चित्त्याचा छर्रे लागल्यामुळे झालेला मृत्यू वन्यजीव संरक्षणाच्या उपाययोजनांबाबत नव्याने प्रश्न उपस्थित करत आहे. या प्रकरणातील नेमके सत्य एसटीएफच्या तपासानंतरच स्पष्ट होणार आहे.