मुंबई
rapido, ola and uber मुंबईतील माहिम परिसरात रॅपिडो बाइक टॅक्सी चालवणाऱ्या एका व्यक्तीविरोधात दहशतवादविरोधी पथकाने केलेल्या कारवाईनंतर राज्य सरकारने ॲपआधारित प्रवासी वाहतूक सेवांबाबत कठोर भूमिका घेतली आहे. परिवहनमंत्री प्रताप सरनाईक यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत रॅपिडो, ओला आणि उबर चालकांची सखोल तपासणी करण्याचे निर्देश परिवहन विभागाला देण्यात आले. तपासणीदरम्यान नियमांचे उल्लंघन किंवा कायद्याने दखलपात्र गैरप्रकार आढळल्यास संबंधित चालकांविरोधात गुन्हे दाखल करण्याचे आदेशही सरनाईक यांनी दिले आहेत.
माहिम येथील घटनेच्या पार्श्वभूमीवर आयोजित बैठकीत ॲपआधारित प्रवासी वाहतूक सेवांमधील चालकांच्या पडताळणीचा मुद्दा चर्चेला आला. या सेवांशी संबंधित चालकांचे ड्रायव्हिंग लायसन्स, वाहनांची कागदपत्रे आणि त्यांची पार्श्वभूमी यांची काटेकोर तपासणी करण्यात यावी, असे निर्देश परिवहनमंत्र्यांनी दिले. तपासणीमध्ये नियमभंग किंवा कायद्याचे उल्लंघन आढळल्यास संबंधितांवर नियमानुसार कठोर कारवाई करण्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
रॅपिडो, ओला आणि उबरसारख्या ॲपआधारित सेवांचा वापर मोठ्या प्रमाणावर वाढत असताना प्रवाशांची सुरक्षितता आणि वाहतूक नियमांची अंमलबजावणी यांना प्राधान्य देणे आवश्यक असल्याचे परिवहनमंत्र्यांनी अधोरेखित केले. या सेवांमध्ये कार्यरत असलेल्या चालकांनी लागू असलेल्या कायद्यांचे आणि नियमांचे पालन करणे गरजेचे आहे. त्यामुळे मोटार परिवहन विभागाने तपासणी मोहिमेत कोणतीही हलगर्जी करू नये, असे निर्देश देण्यात आले आहेत.
सध्याच्या कायद्यांमधील तरतुदी पुरेशा ठरत नसल्याचे आढळल्यास चालकांना कायद्याच्या कक्षेत आणण्यासाठी स्वतंत्र सुधारित कायदा करण्याचाही विचार केला जाईल, असे प्रताप सरनाईक यांनी स्पष्ट केले. ॲपआधारित प्रवासी वाहतूक क्षेत्रातील नियम अधिक प्रभावीपणे लागू करण्यासाठी आवश्यक कायदेशीर बदल करण्याचा पर्याय सरकार गांभीर्याने तपासणार असल्याचेही त्यांनी सूचित केले.
दरम्यान, माहिममधील घटनेच्या पार्श्वभूमीवर परिवहन विभागाकडून चालकांची तपासणी आणि नियमभंग करणाऱ्यांवरील कारवाई कशा प्रकारे केली जाते, याकडे लक्ष लागले आहे. प्रवाशांची सुरक्षितता सुनिश्चित करण्याबरोबरच वाहतूक क्षेत्रात कायद्याचे पालन व्हावे, हा या कारवाईमागील मुख्य उद्देश असल्याचे सांगण्यात आले आहे.