Meta चा ‘डिजिटल फटका’! हिंदूंच्या WHC व्हिडीओवर कारवाई

    दिनांक :28-Oct-2026
Total Views |

नवी दिल्ली,
meta-removes-fadnavis-whc-video‘वर्ल्ड हिंदू काँग्रेस’ 2026 च्या आयोजन समितीने मुंबई पोलीस, दिल्ली पोलीस आणि इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालयाला पत्र लिहिले आहे. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा एक व्हिडिओ मेटाने हटवल्याप्रकरणी, त्या कंपनीकडून स्पष्टीकरण मिळवण्यासाठी हस्तक्षेप करण्याची विनंती समितीने केली आहे. या व्हिडिओमध्ये मुख्यमंत्री हिंदूंना ‘वर्ल्ड हिंदू काँग्रेस’मध्ये सहभागी होण्याचे आवाहन करत आहेत.
 
 
meta
ही परिषद 18 ते 20 डिसेंबर 2026 दरम्यान मुंबईत आयोजित केली जाणार आहे. आयोजकांच्या म्हणण्यानुसार, हा व्हिडिओ 26 ऑक्टोबर 2026 रोजी फेसबुक, इंस्टाग्राम आणि इतर प्लॅटफॉर्मवर प्रसिद्ध करण्यात आला होता. काही तासांतच, ‘माहिती तंत्रज्ञान नियमां’मधील कायदेशीर तरतुदींचा हवाला देत, भारतात हा व्हिडिओ पाहण्यावर निर्बंध घालण्यात आले. आयोजकांनी 26 ऑक्टोबरच्या रात्री पुन्हा हा व्हिडिओ अपलोड केला. परंतु 27 ऑक्टोबर 2026 रोजी तो पुन्हा हटवण्यात आला.
 
‘वर्ल्ड हिंदू काँग्रेस’ने यावर चिंता व्यक्त केली आहे की, मेटाने केवळ अस्पष्ट कायदेशीर तरतुदींचा उल्लेख केला आहे. नेमकी कोणती कायदेशीर तरतूद किंवा प्लॅटफॉर्म धोरण लागू करून हा व्हिडिओ प्रतिबंधित केला, हे स्पष्ट केलेले नाही. या निर्णयामागे हिंदू ध्येयधोरणांविरुद्धचा पूर्वग्रह असू शकतो, अशी भीतीही त्यांनी व्यक्त केली आहे. तसेच मेटाच्या ‘कंटेंट मॉडरेशन’ धोरणांच्या निष्पक्षतेवर आणि सुसंगततेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे.
 
आयोजकांनी संबंधित प्राधिकरणांना विनंती केली आहे की, त्यांनी मेटाकडून हा व्हिडिओ हटवण्यामागची कारणे जाणून घ्यावीत, ही कारवाई कायद्यानुसार योग्य होती का याची तपासणी करावी आणि प्रतिबंधित केलेली सामग्री पुन्हा बहाल करावी. भविष्यात हिंदू धर्मीय आशयाविरुद्ध अशी कारवाई पुन्हा होऊ नये, म्हणून ‘कंटेंट मॉडरेशन’ धोरणे कोणत्याही धार्मिक किंवा वैचारिक पूर्वग्रहाशिवाय, निष्पक्षपणे लागू केली जावीत, अशी मागणीही त्यांनी केली आहे.