अनिल कांबळे
नागपूर
nagpur crime news खापरखेड्यातील गाजलेल्या चायनीज ठेला हत्याकांडात गेल्या चार वर्षांपासून फरार असलेल्या आरोपीला गुन्हे शाखेच्या युनिट क्रमांक ६ ने अटक केली. प्रशांत ऊर्फ सोनू शंकर चौधरी (३४), रा. दत्तनगर, खापरखेडा, असे अटकेतील आरोपीचे नाव आहे. त्याने २०१५ मधील अपहरणासह खून आणि २०१९ मधील लुटमारीच्या गुन्ह्यातही सहभाग असल्याची कबुली दिली.
२१ जानेवारी २०२१ रोजी मध्यरात्री २.३० वाजताच्या सुमारास खापरखेड्यातील प्रभाग क्रमांक २ मधील गावंडे कॉम्प्लेक्ससमोर चायनीजचा ठेला लावणाऱ्या प्रशांत मुकेश घोडेस्वार (३२) याच्याशी ठेला हटविण्याच्या कारणावरून आरोपींचा वाद झाला होता. या वादातून सुधीर ऊर्फ चोया पिंपळे, सागर माहुरकर, कासिम अयुब पठाण, सुलतान रहीत गडकनोजे, आनंद शिंदे, आशीष भड आणि प्रशांत चौधरी यांनी संघटितपणे धारदार शस्त्रांनी हल्ला करून घोडेस्वार याची हत्या केल्याचा आरोप आहे. या प्रकरणी खापरखेडा पोलिसांनी खुनासह शस्त्र अधिनियम आणि अनुसूचित जाती-जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा दाखल केला होता. तपासादरम्यान सहा आरोपींना अटक करण्यात आली; मात्र प्रशांत चौधरी हा हत्येनंतर फरार झाला होता. त्याचा कसून शोध पोलिस निरीक्षक भरत कऱ्हाडे यांचे पथक घेत होते. शेवटी त्यांना तपासात यश मिळाले.
तांत्रिक तपासाद्वारे आरोपीचा माग
गुन्हे शाखेच्या युनिट ६ चे प्रमुख पोलिस निरीक्षक भरत कऱ्हाडे यांच्या नेतृत्वातील पथकाने तांत्रिक तपासाच्या आधारे आरोपीचा माग काढला. तो खापरखेड्यातील चनकापूर परिसरातील डब्ल्यूसीएल कॉलनीत असल्याची माहिती मिळाल्यानंतर त्याला ताब्यात घेण्यात आले. चौकशीत त्याने हत्येच्या गुन्ह्यात सहभाग असल्याची कबुली दिल्याचे पोलिसांनी सांगितले. तसेच देवळी (जि. वर्धा) पोलीस ठाण्यात २०१५ मध्ये दाखल असलेल्या अपहरणासह खुनाच्या प्रकरणात आणि खापरखेडा पोलिस ठाण्यात २०१९ मध्ये नोंदविलेल्या लुटमारीच्या गुन्ह्यातही सहभाग असल्याची कबुली दिली. अटकेनंतर आरोपीला पुढील कारवाईसाठी खापरखेडा पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आले आहे.